दाम्पत्याची बँक अधिकाऱ्याकडून लाखोंची खंडणी
पतीला तात्काळ फोन करायचा आहे, असे सांगितल्याने माणुसकीच्या भावनेतून तरुणीला वापरण्यासाठी दिलेला मोबाइल फोन एका बँक अधिकाऱ्याला चांगलाच महागात पडला. सदर तरुणीने पतीच्या साहाय्याने या बँक अधिकाऱ्याकडून लाखो रुपयांची खंडणीवसुली केली. नाव बदलून वावरणाऱ्या या दाम्पत्याला मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने अटक केली.
राष्ट्रीयीकृत बँकेत काम करणारा एक अधिकारी घरी जाण्यासाठी मरिन लाइन्स रेल्वे स्थानकात उभा असताना एका तरुणीने पतीला फोन करण्यासाठी मोबाइल फोन मागितला. माणुसकीच्या भावनेने सदर अधिकाऱ्याने फोन दिला. कुणाशी तरी बोलून झाल्यानंतर तिने मोबाइल परत दिला. मात्र संबंधित अधिकारी कुठे काम करतो आदी तपशील लाडिवाळपणे विचारला आणि तेथेच तो फसला.
तीन दिवसांनंतर संबंधित तरुणीने बँकेत खाते उघडायचे असल्याचे सांगून या अधिकाऱ्याला अंधेरीला येण्याची गळ घातली. तरुणीच्या लाडीक बोलण्याला भुलून हा अधिकारी तिला भेटण्यासाठी गेला. आठवडय़ानंतर ही तरुणी आणखी एका तरुणासोबत त्याच्याच डब्यात दिसली. तसेच, या अधिकाऱ्याकडे बोट दाखवत होती. त्यामुळे घाबरलेला हा अधिकारी मुंबई सेंट्रलला घर असतानाही तेथे न उतरता मालाडपर्यंत गेला. मालाडला उतरल्यानंतर ते दोघे मागे आले. छेड काढतो काय, पाठलाग करतो, असे सांगून त्या दोघांनी लोकांना जमा केले आणि प्रकरण मिटविण्यासाठी ५० हजार रुपये मागितले. नातेवाईकाला सांगून बँक अधिकाऱ्याने ५० हजार रुपये दिले.
चार-पाच दिवसांनी या तरुणीसोबत दिसलेला जावेद नामक तरुण तिच्यासह थेट बँक अधिकाऱ्याच्या काळबादेवी शाखेत आला. ही तरुणी गरोदर असल्याचे सांगून तीन लाख मागितले. गर्भपात करण्यासाठी तिला अहमदाबाद येथे न्यावे लागेल, असे सांगून आणखी तीन लाख रुपये उकळले. संपूर्ण प्रकरण मिटविण्यासाठी केलेली दहा लाखांची मागणीही बँक अधिकाऱ्याने पूर्ण केली.
मे, २०१५ मध्ये सायन शाखेत असलेल्या या अधिकाऱ्याकडे जावेद पुन्हा आला. गर्भवती महिलेने पोलीस ठाण्यात तक्रार केल्यामुळे पोलीस तुला शोधत आहेत. हे प्रकरण मिटविण्यासाठी ८० लाख मागितले. प्रत्येकी २० लाखांचे पुढच्या तारखांचे दोन धनादेशही घेतले. उर्वरित ४० लाखांसाठी दोन कोऱ्या स्टॅम्प पेपरवर सह्य़ा घेऊन अनुक्रमे जाफर व सलीम यांच्या नावे २० लाख घेतल्याचे भासविले. या पैशासाठी जावेदने सतत तगादा लागला. त्यामुळे बँक अधिकाऱ्याने १० लाख रुपये रोख दिले. परंतु यापुढे पैसे देऊ शकत नसल्याचे सांगून तो पोलिसांकडे गेला. खंडणीविरोधी कक्षाचे वरिष्ठ निरीक्षक विनायक वत्स यांच्या पथकाने सापळा रचून संबंधित तरुणीसह जावेदला अटक केली. विकी गर्ग ऊर्फ विकास गुप्ता आणि शिल्पा जाधव उर्फ गर्ग अशी त्यांची नावे असून ते विवाहित दाम्पत्य आहे. मूळ इंदूरच्या असलेल्या विकासने झटपट श्रीमंतीसाठी हा मार्ग अवलंबिला, असेही त्यांनी सांगितले.

अपेक्षा पाच हजारांचीच
पाच हजार रुपये उकळण्याची त्यांची इच्छा होती. परंतु सुरुवातीलाच ५० हजार रुपये दिल्यामुळे त्यांची हिंमत वाढल्याचे वत्स यांनी सांगितले. पाच हजारांवरून लाखो रुपयांचा गंडा घालण्यात या जोडप्याला यश आले.