अमित चक्रवर्ती

विक्रोळीच्या कन्नमवारनगर येथील पालिकेच्या शाळेत सध्या छत्र्या बनवण्याची लगबग सुरू आहे. रंगीबेरंगी, विविध नक्षी असलेल्या या छत्र्या दिसायला आकर्षक आहेतच; पण त्यांचं आणखी एक वैशिष्टय़ आहे, ते म्हणजे या छत्र्या बनवणाऱ्या सर्व महिला नेत्रहीन आहेत. ‘नॅशनल असोसिएशन ऑफ डिसेबल्ड एंटरप्राइज’ या संस्थेच्या माध्यमातून छत्र्या बनवून या अंध महिलांना उदरनिर्वाहाचे साधन मिळाले आहे. छत्र्यांच्या तारांची जुळणी करून त्यावर कापड बसवण्यापर्यंतची सर्व कामे या नेत्रहीन महिला इतक्या लीलया आणि वेगाने करतात की जणू त्यांच्या हातांनाच दृष्टी लाभल्याचा भास होतो. अतिशय सुंदर अशा या छत्र्यांची याच ठिकाणी विक्रीदेखील सुरू आहे. करोना र्निबधांमुळे गेल्या वर्षीपासून या छत्र्यांना अपेक्षित उठाव नसल्याने संस्थेने आता या छत्र्या ऑनलाइन माध्यमातूनही विक्रीस ठेवल्या आहेत.

छत्री बनवण्याच्या कामासाठी या नेत्रहीन महिला कल्याण, मालाड, बोरिवली येथून विक्रोळीत येतात.  करोनाची भीती असली तरी, अडचणीच्या वेळी सहप्रवासी लगेच मदतीचा हात देतात, असे त्या सांगतात. रस्ता ओलांडणे किंवा रेल्वेगाडीत चढताना हमखास कोणीतरी मदत करतो, अशी माहिती मीना तेलकिरे यांनी दिली.

अंतर राखण्यासाठी कान दक्ष

अंध व्यक्तींसाठी अंतर नियमांचे पालन करणे कठीणच. मात्र, संस्थेत कार्यरत असलेल्या या अंध महिला आवाजाच्या तीव्रतेवरून समोरील व्यक्तीपासूनच्या अंतराचा अंदाज घेतात आणि सुरक्षित अंतर राखतात. यासाठी या महिलांना संस्थेमार्फत विशेष प्रशिक्षणही देण्यात आले आहे. ‘आम्ही मुखपट्टी वापरतो. आधारासाठी एखाद्या पृष्ठभागाला स्पर्श करावा लागल्यास लगेच हात सॅनिटाइज करतो. एखाद्याचा आवाज कानी पडल्यावर तो आपल्यापासून किती अंतरावर आहे, याचा अंदाज घेतो, ’ असे मीना तेलकिरे सांगतात.