क्रेडाई-एमसीएचआयची महापालिका आयुक्तांकडे मागणी

मुंबई : करोना निर्बंधांमध्ये अभियंते, वास्तुविशारद ,  पर्यवेक्षक यांना दररोज बांधकाम प्रकल्पस्थळी जाण्याची मुभा मिळावी आणि गरजेनुसार मजुरांची ने-आण करण्याची परवानगी द्यावी, अशी मागणी बांधकाम व्यावसायिकांच्या  ‘क्रेडाई -एमसीएचआय ‘ संघटनेने महापालिका आयुक्तांकडे केली आहे.

क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोराडिया व सचिव प्रीतम चिवुकुला यांनी यासंदर्भात पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांना पत्र पाठविले आहे. राज्य सरकारने १३ एप्रिल रोजी लागू केलेल्या करोना निर्बंधांमध्ये बांधकाम प्रकल्प सुरू ठेवण्याची परवानगी दिली आहे. पण हे काम अभियंते, वास्तुविशारद व निरीक्षकांच्या देखरेखीखाली व्हावे लागते. ते बांधकाम आराखड्यानुसार आहे की नाही, यावर लक्ष ठेवावे लागते. अन्यथा एखादी दुर्घटना घडून जीवीतहानी होण्याचाही धोका असतो.

त्याचबरोबर बांधकाम मजुरांना त्यांच्या बांधकाम स्थळी वाहनांमधून नेताना निर्बंधांचे पालन केले जाईल, असे संघटनेने  स्पष्ट केले आहे.