मुंबई लोकलमधील पश्चिम रेल्वे मार्गावर प्रवास करणाऱ्या एका तरूणीसोबत मंगळवारी रात्री धक्कादायक प्रकार घडला. एका सोनसाखळी चोरापासून वाचवणाऱ्या तरूणीला नंतर त्या संरक्षण करणाऱ्या तरूणानेच लुटल्याची घटना घडली. मंगळवारी रात्री उशिरा कांदिवलीला आपल्या भावाला भेटण्यासाठी तरूणीने बोरिवलीहून ११ वाजून ४४ मिनिटांची लोकल पकडली. ती लोकलच्या जनरल डब्ब्यात चढली असता संपूर्ण डब्ब्यात सामसूम होती. केवळ एक रहिम शेख नावाचा ३२ वर्षीय तरूण डब्ब्यात झोपलेला होता. त्यानंतर हा भयकंर प्रसंग घडला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बोरिवलीहून ट्रेन सुटण्याआधी एक तरूण लोकलमध्ये चढला. त्या ३२ वर्षीय तरूणाचे नाव ओमप्रकाश दिक्षित असल्याचे पोलिसांकडून नंतर समजले. ओमप्रकाशने डब्ब्यात घुसताच त्या तरूणीच्या गळ्यावर चाकू ठेवला आणि तिने परिधान केलेला सोन्याचा नेकलेस व मोबाईल देण्यास सांगितलं. तरूणीचं रडणं ऐकून उठलेल्या रहीम शेखने दिक्षितशी दोन हात करत त्याला डब्ब्यातून हाकलून लावले. तसेच, “तु माझ्या बहिणीसारखी आहेस. तुला कोणताही धोका नाही’, असे रहीमने तरूणीला सांगितले.

(संग्रहित छायाचित्र)

 

बोरिवली स्टेशनवरून ट्रेन सुटताना रहीमने दिक्षितला हाक मारून परत डब्ब्यात बोलवून घेतले. त्यानंतर बोरिवली ते कांदिवली स्टेशनांदरम्यान, रहीमने त्या तरूणीशी वाईट वर्तणुक केली. तिचे दागिने आणि मोबाईलदेखील लुटलं. हा प्रकार घडत असतानाच तरूणीने अलार्मची चेन खेचली आणि तितक्यात कांदिवली स्टेशन आल्याने दोघेही डब्ब्यातून उतरून पसार झाले. अलार्मच्या आवाजामुळे स्थानिक रेल्वे पोलिसांनी चपळाई दाखवत दिक्षितला लगेचच पकडले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

बोरिवली रेल्वे पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक भास्कर पवार यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले, “CCTV कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यांच्या आधारावरून एक स्केच तयार करून घेण्यात आले. त्यानंतर विविध तुकड्या कांदिवली आणि आसपासच्या परिसरात पाठवण्यात आल्या. रहीम शेख हा अंमली पदार्थांचे सेवन करणारा तरूण असल्याचे आम्हाला समजले. कांदिवलीतील झोपडपट्टीमध्ये सार्वजनिक स्वच्छतागृहांमधून रहीम अशी कामं करतो अशी माहिती आम्हाला मिळाली. त्यानुसार रहीमला कांदिवली पश्चिम येथून अटक करण्यात आली.

रहीम शेख आणि दिक्षित एकमेकांना आधीपासून ओळखत नव्हते. तरूणीला वाचवण्याचं रहीमने केवळ नाटक केलं होतं. त्यानंतर तरूणीला लुटण्याची संधी असल्याचं पाहिल्यावर त्याने पटकन दिक्षितला बोलावून घेतलं होते, असेही पवार यांनी स्पष्ट केले.