अश्लील चित्रफीत प्रकरण

मुंबई : अभिनय क्षेत्रातील नामांकित व्यक्तींना समाजमाध्यमावरून व्हिडीओ कॉल करून त्यांच्या अश्लील चित्रफीत तयार करून पैसे उकळणाऱ्या टोळीला सायबर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी २५० हून अधिक व्यक्तींच्या अश्लील चित्रफिती तयार करून त्यांच्याकडून पैसे उकळल्याचे समोर आले आहे. तसेच या चित्रफितींची ८० जणांना विक्री केल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे.

याप्रकरणी ओडिसा, उत्तर प्रदेश, गुजरातसह महाराष्ट्रातील नागपूर येथे छापा मारून पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह ५ जणांना अटक केली आहे. हे सर्व तरुण अभियांत्रिकी आणि विज्ञान शाखेचे उच्चशिक्षित असल्याचे पोलिसांच्या तपासातून समोर आले आहे. गोविंद कुशवाह, सौरभ मंडल, सागर कीर्तने आणि भोजराज अशी अटक आरोपींची नावे आहेत.

आरोपींनी तरुणींच्या नावाने ट्विटरवर ५, इंन्स्टाग्रामवर ४ आणि फेसबुकवर ३ खाती उघडली होती. तर टेलिग्रामवर ग्रुप तयार केला होता. याद्वारे अभिनय क्षेत्रातील तसेच नामांकित व्यक्तींना संपर्क साधत असत. सुरुवातीला ते त्यांच्याशी मैत्री करत असत. त्यानंतर ते या नामांकित व्यक्तींना अर्धनग्न अवस्थेत संपर्क साधून त्यांनाही तसे करण्यास सांगत होते. या व्यक्तींच्या नकळत त्यांचे चित्रीकरण करून त्यांच्याकडे पैशांची मागणी केली जात होती. अशाच प्रकारे मुंबईतील एका नामांकित व्यक्तीची आरोपींनी चित्रफीत तयार केली होती. तसेच त्याच्याकडे पैशांची मागणी केली होती. याप्रकरणी या व्यक्तीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली होती. तसेच आरोपींनी समाजमाध्यमातून चित्रफिती असल्याची माहिती प्रसारित करून त्याची ८० जणांना विक्री केली. यासाठी आरोपींनी टेलिग्रामवर ग्रुप तयार केला होता, अशी माहिती पोलीस उपायुक्त रश्मी करंदीकर यांनी दिली.

तपास असा…

आरोपींनी गुन्ह्यासाठी बनावट बँक खाते आणि नावांचा वापर केला होता. याबाबत बीकेसी सायबर पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक शालिनी सहस्राबुद्धे यांच्या मार्गदर्शनाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक पूनम जाधव यांनी तांत्रिक तपास सुरू केला. यामध्ये ओडिसामधून आरोपी अशा प्रकारे देशभरातील अनेकांची फसवणूक करत असल्याचे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी चार पथके तयार करून एकाच वेळी उत्तर प्रदेश, गुजरात, ओडिसा आणि नागपूर येथे छापा मारून रात्रीच्या वेळी आरोपींना अटक केली. तर आरोपींकडून ६ भ्रमणध्वनी पोलिसांनी जप्त केले.