राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवर निवेदन देताना राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्तेत आल्यापासून राज्यात गुन्हेगारीचे प्रमाण घटल्याचा दावा शुक्रवारी विधानसभेत केला. आकडेवारीच्या भरवशावर कायदा-सुव्यवस्था चालू शकत नाही पण समोरून विरोधक आकडेवारीच्या बळावर आरोप करीत असतील, तर मलाही आकडेवारीनेच उत्तर देणे भाग आहे, असे प्रत्युत्तर देत फडणवीस यांनी राज्यातील गुन्हेगारीचा दर गेल्यावर्षभरात ३२.६ टक्क्यांवरून ८ टक्क्यांपर्यंत खाली आला असल्याचे सांगितले. नागपूर पोलिसांनीही वर्षभरात चांगली कामगिरी केली आहे. तब्बल ३१ वर्षांनंतर नागपूरमध्ये गुन्हेगाराला फाशी देण्यात आली. याकूबला फाशी दिल्यानंतर राज्याच्या कायदा-सुव्यवस्थेला धक्का पोहचणारी नाही याची खबरदारी घेत पोलिसांनी चोख बंदोबस्त केला. कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही, हे राज्याच्या पोलिसांचे यश आहे. त्यांचे खच्चीकरण करण्याऐवजी कौतुक करायला हवे, असे फडणवीस म्हणाले. नागपूरमधील गुन्हेगारीचे प्रमाण घटले आहे फक्त गृहमंत्री नागपूरचा म्हणून बेछुट आरोप केले जात असल्याचे प्रत्युत्तर फडणवीस यांनी यावेळी विरोधकांना दिले. मुंबईच्या मालवणीत झालेल्या विषारी दारूकांडातील गुन्हेगारांवर ३०२ अंतर्गत गुन्हा नोंदविला असून गुन्हेगारांना फाशी देण्यासाठीच सरकार प्रयत्न करील, असे फडणवीस म्हणाले.
आषाढी एकादशी दिवशी पंढपूरच्या विठ्ठल मंदिरातील पूजेच्या वादावर देखील मुख्यमंत्र्यांनी सविस्तर स्पष्टीकरण दिले. जिल्हाधिकारी तुकाराम मुंडे मंदिर समितीचे हंगामी अध्यक्ष असल्यामुळेच त्यांनी नियमानुसार पुजा केली. आम्हाला बाहेर उभे रहावे लागले नाही. त्यामुळे अजित पवार यांच्यासारख्या जाणत्या नेत्याने जरा माहिती घेऊन बोलायला हवे होते, असा टोला फडणवीस यांनी यावेळी लगावला.