अपुरा पाऊस, पाण्याची टंचाई आणि वाढता उन्हाळा यामुळे १५१ तालुक्यात राज्य सरकारने दुष्काळ जाहीर केला आहे. यामधील १२२ तालुक्यात परिस्थिती अतिशय गंभीर आहे. सराकारने दुष्काळी भागात योग्य ती उपाययोजना करवी अन्यथा मनसेच्या रोषाला सामोरं जावे लागेल असा इशारा मनसेने ट्विट करत दिला आहे. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी प्रशासकीय काय आहेत हे समजून घेऊन शेतकऱ्यांपर्यंत त्या पोहचविल्या जातील. दुष्काळाची दाहकता कमी करण्यासाठी मनसे कटिबद्ध आहे आणि ही भूमिका प्रत्यक्ष कृतीतून महाराष्ट्राला दिसेलच असेही या ट्टिटमध्ये म्हटले आहे.

मनसेसह इतर विरोधी पक्षांनी सरकारला धारेवर धरल्यामुळे महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर केला परंतु त्यासाठी कराव्या लागणाऱ्या उपाययोजना, करावी लागणारी प्रशासकीय आखणी सरकारतर्फे अमलात नाही. म्हणून आता महाराष्ट्र सैनिक जातीने ह्यावर लक्ष ठेवणार आहेत.

 

राज्यातील २०१ तालुक्यांतील सुमारे २० हजार गावांत अपुऱ्या पावसामुळे भीषण टंचाई आहे. या सर्व तालुक्यांत सरासरीच्या ७५ टक्के पेक्षा कमी, त्यातही काही तालुक्यांमध्ये जेमतेम २५ टक्क्यांच्या आसपास पाऊस झाला आहे. या भागातील पिके तसेच पिण्याचे पाणीसाठे धोक्यात आले आहेत. मराठवाडय़ातील औरंगाबाद, उस्मानाबाद, जालना, नांदेड, परभणी, बीड, लातूर, हिंगोली तसेच उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदूरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्य़ांतील परिस्थिती अधिक गंभीर आहे. राज्याच्या अन्य भागांतही काही तालुक्यांमध्ये अशीच स्थिती आहे.