सुधारित नागरिकत्व कायद्याची धास्ती

मुंबई : सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे धास्तावलेले नागरिक मुंबई महापालिका कार्यालयांत जन्म-मृत्यू दाखला मिळवण्यासाठी खेटे घालू लागले आहेत.   दाखले मिळवण्यासाठी गर्दी होऊ लागल्यामुळे अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढला आहे.

सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात देशभर आंदोलने होत आहेत. मुख्यत्वे अल्पसंख्याक, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती व अन्य प्रवर्गातील नागरिकांकडून या कायद्याविरोधात आंदोलने होत आहेत. या कायद्याची अंमलबजावणी झाल्यास अडचण होऊ नये, या विचाराने नागरिकांनी जन्म-मृत्यूचा दाखला मिळवण्यासाठी पालिका कार्यालयांमध्ये गर्दी करण्यास सुरूवात के ली आहे.

नाव आणि आडनावात बदल करण्यासाठी सरकारी कार्यालयांमध्ये नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे, याकडे आमदार, नगरसेवक रईस शेख यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पालिका आयुक्त प्रवीणसिंह परदेशी यांचे लक्ष वेधले आहे. जन्म-मृत्यू दाखला मिळवण्यासाठी, तसेच नावातील बदलासाठी नागरिकांची होत असलेली गर्दी लक्षात घेऊन सरकारी आणि पालिका कार्यालयांमध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या वाढवावी, अशी मागणी रईस शेख यांनी केली आहे.