काळ आला होता पण वेळ आली नव्हती या म्हणीचा प्रत्यय गुरूवारी रात्री मुंबईत झालेल्या पूल दुर्घटनेत आला. मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानकाजवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. या दुर्घटनेत २१ वर्षीय विद्यार्थ्याचा जीव वाचला. जर दोन सेकंद आधीक त्या पूलावर असता तर त्याच्यावर काळाने घाला घातला असता. मात्र, म्हणतात ना काळ आला होता पण वेळ आली नव्हती.

गिरगावात राहणारा २१ वर्षीय निलेश येडगे हा नेहमीप्रमाणे नवी मुंबईतील तेरणा इंजिनिअर कॉलेजहून घरी परतत होता. संध्याकाळच्या वेळी नेहमीप्रमाणे निलेशने पादचारी पूल ओलांडला. त्यानंतर फक्त २ सेकंदामध्ये पूल खाली कोसळला आणि होत्याचं नव्हतं झालं. पण निलेशचे काका ३८ वर्षीय आत्माराम येडगे यामध्ये गंभीर जखमी झाले. आत्माराम येडगे गली १० ते १५ वर्षांपासून हिमालय पूलाखाली केळी विकण्याचा व्यावसाय करत आहेत. अचानक पूल कोसळल्यामुळे आत्माराम येडगे गंभीर जखमी झाले आहे. त्यांच्यावर सध्या जीटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

निलेश दररोज घरी जाताना काकांची भेट घेतो. मात्र, त्यादिवशी निलेशने पूल ओलांडला आणि त्याला एकदम धडम असा आवाज आला. त्याने मागे पाहल्यानंतर पूल कोसळल्याचे दिसते. काहीवेळासाठी तो सून्न झाला. मात्र, पुढच्याच क्षणाला त्याला आपल्या काकांची आठवण झाली. त्याने लगेच काकांकडे धाव घेतली. त्यांच्या आंगावर पूलाचा मलबा कोसळला होता. दोघातिघांची ढिगाऱ्याखालून सुटका केल्यावर निलेशने काकांना घेऊन जीटी हॉस्पीटल गाठले. निलेशच्या काकांना कंबरेला जबर मार लागला आहे.