35 वर्षांचा तपेंद्र सिंग हा वडाळ्यात रहायचा… वडिलांचे निधन झाले होते…घरातील जबाबदारी त्याच्यावर होती.. तपेंद्र गुरुवारी संध्याकाळी प्रिटिंग प्रेसमधील काम संपवून घरी जाण्यासाठी निघाला…पण तो घरी पोहोचलाच नाही… मुंबई महापालिका आणि रेल्वे प्रशासनाच्या बेपर्वाईने त्याचा बळी घेतला….‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील पूल कोसळला आणि तपेंद्रचा यात दुर्दैवी अंत झाला.

वडाळ्यात तपेंद्र सिंग त्याचा भाऊ आणि आईसह राहत होता. तपेंद्रच्या वडिलांचे लहानपणीच निधन झाले होते. घरातील मोठा मुलगा असल्याने तपेंद्रवर कुटुंबाची जबाबदारी होती.. कमी वयातच तपेंद्रने ही जबाबदारी स्वीकारली. १४ व्या वर्षांपासून तो नोकरी करत होता, असे त्याचे नातेवाईक सांगतात. सध्या तपेंद्र हा एका प्रिटिंग प्रेसमध्ये कामाला होता. तो दररोज सीएसएमटी स्थानकातून प्रवास करायचा.

गुरुवारी संध्याकाळी तपेंद्रने नेहमीप्रमाणे काम संपवले आणि तो घरी जाण्यासाठी निघाला. ट्रेन पकडण्यासाठी तो दादाभाई नौरोजी मार्गावरुन सीएसएमटी स्थानकाला जोडणाऱ्या पुलावरुन जात होता. यादरम्यान पूल कोसळला आणि तपेंद्रचा मृत्यू झाला. तपेंद्रच्या मृत्यूची बातमी समजताच त्याच्या भावाने रुग्णालय गाठले. भावाच्या निधनाने त्याला मानसिक धक्का बसला असून भावाच्या आठवणीने त्याला अश्रू आवरता येत नव्हते.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या मुख्यालयापासून हाकेच्या अंतरावर असलेला ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस स्थानका’जवळील दादाभाई नौरोजी मार्गावरील हिमालय पादचारी पूल गुरुवारी सायंकाळी ऐन गर्दीच्या वेळी कोसळून झालेल्या दुर्घटनेत सहा जण मृत्युमुखी पडले, तर ३१ जण जखमी झाले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे.