वसईचे  समाजरंग : विशाखा कुलकर्णी

vishu199822@gmail.com

एखादी संस्कृती जपली जाते असे जेव्हा आपण म्हणतो तेव्हा त्याचा साधारण अर्थ हा होतो की एखाद्या समाजाच्या जीवनशैलीतून, राहणीमानातून आणि संस्कारातून ती संस्कृती डोकावत असते, त्याच्या निरीक्षणातून ती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जाते. हे निरीक्षण लग्नकार्य तसेच घरातील धार्मिक विधीतून सहज होत असते, याच धार्मिक विधीची माहिती समाजाचा अभ्यास करताना केली पाहिजे.

जेव्हा एखाद्या समाजाचे लोक काही सोहळा किंवा दु:खदप्रसंगी एकत्र येतात तेव्हा त्यांची वर्तणूक हीच त्या संस्कृतीचे द्योतक असते. घरोघरी होणारे संस्कार आणि एखाद्या निमित्ताने समाज एकत्र आल्यावर साजरा केला जाणारा प्रसंग, केले जाणारे वेगवेगळे धार्मिक विधी हे त्या संस्कृतीचा अविभाज्य भाग ठरतात. असे प्रसंग म्हणजे कोणते? तर वेगवेगळ्या समाजांमध्ये लग्नाचे विधी वेगवेगळे असतात, कुठे स्वत:च्याच लग्नात वर मंडपातून पळून जातो तर काही ठिकाणी जावयाचे पाय धुण्याची प्रथा असते, कुठे लग्नापेक्षा हळदीचे महत्त्व असते, तर कुठे हळद केवळ नावापुरती लावली जाते. काही समाजामध्ये वयाच्या नवव्या दहाव्या दिवशी मुलाची मुंज, अर्थात उपनयन संस्कार केले जातात. या पद्धती कशा केल्या जातात, यांचे महत्त्व काय याची धारणा प्रत्येक समाजानुसार बदलत असते.

वसईतील सामवेदी ब्राह्मण समाजामध्ये आजदेखील विवाहसोहळे तसेच इतर धार्मिक कार्य करण्याच्या माध्यमातून आपली परंपरा आणि संस्कृती जपली जाते.

वसईच्या आसपास सामवेदी समाज ज्या बारा गावांमध्ये वसलेला आहे त्या गावांमध्ये आणि समाजातच रोटीबेटी व्यवहार होतो. अपवादात्मक परिस्थितीतच या बारा गावांच्या बाहेर कुणाशी लग्न होते. ज्याचे लग्न करायचे आहे त्या मुलाच्या किंवा मुलीच्या घरचे कुणा नातेवाईकाकरवी किंवा समक्ष एखाद्या इष्ट मुलाकडे किंवा मुलीकडे मागणी घालण्यास जातात, अर्थात या मुलाची किंवा मुलीची माहिती याआधी ओळखीच्या लोकांना विचारली जाते. या माहितीच्या आधारे लग्न जुळवले जाते. सामवेदी समाजातील लग्नामधील एक महत्त्वाची बाब म्हणजे समाजात लग्नाआधी पत्रिका पाहिली जात नाही. लग्न ठरल्यानंतर मुलाकडची अर्थात वरपक्षाकडील मंडळी वधूच्या घरी येतात. वधूसाठी साडी व अलंकार दिले जातात आणि अमुक व्यक्तीची मुलगी अमुक व्यक्तीला दिली असे जाहीर करून वडीलधाऱ्यांची संमती घेऊन साखर वाटली जाते. हा कार्यक्रम घरच्या घरीच होतो. या कार्यक्रमात लग्न ठरल्याचे जाहीर होते आणि याला साखरपुडा न म्हणता ‘साखर खाणे’ असे सामवेदी समाजामध्ये संबोधले जाते.

लग्नाच्या आदल्या दिवशी घरी ग्रहमखाचा कार्यक्रम होतो. याला अगेरमेड असे म्हणतात. यानंतर ओटी भरण्याचा विधी होतो. यात वराकडची पाच माणसे येऊन मुलीला साडी व फळ देतात. या वेळी वर आणि वधू दोन्हीकडच्या मंडळींना बसवून गणेश पूजन केले जाते आणि दोन्हीकडच्या कुटुंबांचा गोत्रोच्चार केला जातो. या विधीतील सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे गोत्रोच्चार आहे. याच दिवशी हळदीचा देखील कार्यक्रम होतो. या वेळी वधूकडील मंडळी वराकडे हळद लावण्यासाठी जातात.

लग्न हे वरपक्ष वधूच्या गावी येऊन लावले जाते. वरात ही पूर्वी बैलगाडी अथवा टांग्यातून नेली जात असे. सामवेदी लग्नातील विधींना सुरुवात करताना लग्नाच्या दिवशी वर मंडपात आल्यानंतर वरची दृष्ट काढली जाते आणि त्याला ओवाळलेदेखील जाते. यानंतरचा विधी म्हणजे मधुपर्क पूजन. ज्या वेळी करवलीस साडी देऊन तिचे पाय धुतले जातात आणि तिलादेखील मान दिला जातो. यासोबतच लग्नाचे कन्यादान, सप्तपदी इत्यादी विधी होतात. सामवेदी लग्नाची सर्वात उत्तम प्रथा म्हणजे सामवेदी समाजात हुंडा दिला-घेतला जात नाही. समाजाच्या संस्कृतीविषयी बोलताना हा भाग खरोखर एक वेगळा आदर्श ठरतो. लग्नात वर आणि वधूस शक्य त्याप्रमाणे स्वखुशीने दागदागिने केले जातात. लग्नाचा खर्च हा दोन्ही पक्षातील आर्थिक परिस्थितीप्रमाणे केला जातो. पारंपरिक लग्नात पंचपक्वान्नाचे जेवण केले जाते. यात लाडू, तांदूळ किंवा शेवयाची खीर, इत्यादी पदार्थ, तसेच वांगी, बटाटा, वालपापडीची भाजी असे पदार्थ तयार केले जातात. सामवेदी ब्राह्मण समाजात लग्नात आहेर घेतला जात नाही. अशा प्रकारे लग्नाच्या सर्व विधी मुलीच्या घरी होतात, अशी माहिती गुरुजी अशोक पंडित देतात.

ते पुढे सांगतात की, समाजात यासोबतच वर्षभर असणाऱ्या सण-उत्सवांबरोबर येणारी धार्मिक कार्येही केली जातात. पिठोरी पूजन, हरतालिकेची पूजा, वटसावित्री, होळी, संक्रांत, गुढीपाडवा असे सण तसेच गणेशोत्सवदेखील साजरा होतो.

या वेगवेगळ्या विधी आधुनिक काळात टिकवणे, जोपासणे यामुळेच समाजाची संस्कृती पुढे जाण्यास मदत होते. आजची पिढीदेखील ही कार्ये पारंपरिक पद्धतीने पार पडतेच, त्याबरोबर यात नावीन्याचा सुरेख संगमही घडवला जातो.