‘जहांगीर आर्ट गॅलरीची जागा कमी पडते. आम्हाला आता आणखी दालनांसाठी याच परिसरात जागा हवी आहे. त्यासाठी कॉपरेरेट विश्वातून आम्हाला अर्थसाह्य़ मिळावं, यासाठी आतापासून प्रयत्न सुरू झाले आहेत,’ असं कलाप्रेमी उद्योजक आणि ‘जहांगीर आर्ट गॅलरी’च्या व्यवस्थापकीय समितीचे सदस्य दिलीप डे यांनी १५ वर्षांपूर्वी जाहीरपणे सांगितलं होतं. हा प्रसंग ‘जहांगीर’ला ५० वर्ष पूर्ण झाली, त्या सोहळ्यातला. एका न्यासातर्फे चालवली जाणारी ‘जहांगीर’ आता पासष्टीची आहे आणि दिलीप डे (शोभा डे या त्यांच्या पत्नी, अशीही एक ओळख) हे आजही व्यवस्थापकीय समितीवर आहेत. अखेर १५ वर्षांनी, ‘टाटा कन्सल्टन्सी सव्‍‌र्हिसेस’च्या सहकार्यानं नवी गॅलरी उघडल्यानं त्यांचं म्हणणं खरं ठरलेलं असताना, या नव्या गॅलरीत भरलेल्या प्रदर्शनाचे गुंफणकार (क्युरेटर)सुद्धा दिलीप डे हेच आहेत!

हे पहिलंवहिलं प्रदर्शन, ‘टीसीएस कलासंग्रहातील निवडक चित्रे’ असं आहे. चित्रांची निवड हे गुंफणकाराचं काम असतंच. पण त्याखेरीज, निवडलेल्या चित्रांचं महत्त्व काय प्रकारचं आहे हे ओळखून ते महत्त्व कोणाही प्रेक्षकापर्यंत पोहोचेल अशा रीतीनं प्रदर्शनाची रचना करणं, त्यासाठी चित्रांसह लेबलं, भिंतीवरला मजकूर (वॉल टेक्स्ट) किंवा चित्रांची अन्य माहिती देणं, या अपेक्षाही गुंफणकाराकडून असतात. ते काम डे यांनी केलेलं नाही. ही सर्व चित्रं संग्राहित असल्यामुळे ती कधीची (कोणत्या साली पूर्ण झालेली आहेत), एवढी तरी माहिती सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं अपेक्षित होतं. ते झालेलं नाही. ‘जहांगीर’च्या अन्य दालनांतली प्रदर्शनं बहुतेकदा नव्या चित्रांचीच असतात; त्यामुळे कोणाला ‘गुंफणकार’ म्हणून श्रेय दिलेलं असलं तरी असल्या गुंफणकारांची जबाबदारी या नव्या चित्रांसाठी एखादा प्रास्ताविकवजा मजकूर लिहिण्यापुरतीच असते. पण ‘जहांगीर’ला आंतरराष्ट्रीय पातळीवर नेण्यासाठी कार्यरत असलेल्या समितीच्या सदस्यांकडून याहून अधिक अपेक्षा असायला हवीच. स्वत:च्या नावाच्या गॅलरीत, स्वत:च्या संग्रहातली चित्रं इतकी चटावर प्रदर्शित होणं चांगलं की वाईट, याचा विचार ‘टीसीएस’नंही करायला हवा.

readers reaction on chaturang articles
प्रतिसाद : ‘महिला व्होट बँक’ हवीच कशाला?
Watch waiter’s priceless reaction to sketch artist's sweet surprise
न मिळालेल्या कौतुकाची पोचपावती! कलाकारानं हॉटेलच्या बिलवर रेखाटलं वेटरचं सुरेख चित्र; चेहऱ्यावर उमटलं सुंदर हास्य, Video Viral
98 year old man's reunion with younger brother
सुरकुतलेल्या चेहऱ्यावर उमटलं गोंडस हसू! ९८व्या वर्षी धाकट्या भावाला पुन्हा भेटले आजोबा, पाहा सुंदर Photo
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना

या पहिल्या प्रदर्शनात मधल्या काळातल्या -म्हणजे साधारण १९६० ते १९८० या दशकांतल्या-  कलाकृतींवर भर दिसतो. आता दिल्लीवासीच असणारे पण १९६० सालातले मुंबईकर क्रिशन खन्ना यांच्यावर जेव्हा मुंबईतल्या तय्यब मेहता आदींचा प्रभाव होता, तेव्हा (म्हणजे केव्हा? गुंफणकारानं नाही सांगितलेलं!) अगदी मेहतांच्या त्या काळातल्या ‘ट्रस्ड बुल’ची आठवण व्हावी, असं एक बैलाचं चित्र खन्ना यांनीही केलं, ते इथं आहे. बाकी अंजली इला मेनन, भूपेन खक्कर आदींची चित्रं त्यांच्या-त्यांच्या विख्यात शैलींचा वस्तुपाठ म्हणावीत अशी आहेत (म्हणजे कशी? गुंफणकार काही सांगत नाहीत. कदाचित कुणा तज्ज्ञाकडून टीसीएस स्वत:च्या संग्रहाबद्दलचं एखादं महागडं पुस्तक लिहून घेईल, ते परवडणाऱ्यांनाच मिळेल माहिती!) .

प्रतीकांमधून (आपापली) गोष्ट..

‘जहांगीर’च्या अन्य दालनांपैकी सभागृह दालनात, ज्येष्ठ (वय ६८) आणि ‘पद्मश्री’प्राप्त चित्रकार गुरचरण सिंग यांच्या चित्रांचं प्रदर्शन भरलं आहे. सिंग यांच्या चित्रांमधला आशय अनेक प्रतीकांमधून उलगडतो. वाद्य (त्यातही व्हायोलिन, ट्रम्पेट, सारंगी), पोपट, ‘रुबिक्स क्यूब’ अशा प्रतीकांनी त्यांची चित्रभाषा तयार होते. त्यापैकी उदाहरणार्थ ‘रुबिक्स क्यूब’चा अर्थ प्रत्येक वेळी ‘कोडं’ असाच असेल असं नाही. पण साधारण तसा असू शकतो. ही चित्रं पाहणाऱ्या प्रेक्षकांनी चित्रांवरून आपापल्या कथा रचाव्यात, पण त्यासाठी आधी अनेक चित्रं पाहावीत, अशी सिंग यांची अपेक्षा आहे. रंग-रेषांतून सहज प्रेक्षकाला भिडणारी; परंतु प्रतीकांमुळे आठवणीत राहणारी अशी ही चित्रं आहेत. ती पाहायलाच हवीत.

ओळीनं तीन असलेल्या ‘जहांगीर’-दालनांपैकी पहिल्यात ‘जेजे कला महाविद्यालया’चे (रेखा व रंगकला) अधिष्ठाता विश्वनाथ साबळे यांच्या अमूर्ताकडे झुकणाऱ्या चित्रांचं प्रदर्शन आहे. गोपाळ अडिवरेकर आदी एकेकाळच्या चित्रकारांनी निसर्ग आणि अमूर्त, तंत्र आणि आशय यांचा मेळ घातला होता. ती गुणवैशिष्टय़ं या चित्रांमध्ये आहेत आणि तरीही चित्रं निराळी दिसत आहेत. रंगांची विविधांगी जाण, तंत्राचा संयमित वापर हे साबळे यांच्या या चित्रांचं निश्चित वेगळेपण आहे. दुसऱ्या दालनातली रमेश थोरात यांची गायतोंडे यांच्या शैलीची आठवण देणारी अमूर्तचित्रं, तर तिसऱ्या दालनातली गणेश चौगुले यांची चित्रं ही या चित्रकारांमध्ये होत असलेले सूक्ष्म बदल दाखवितात. विशेषत: गणेश चौगुले यांची चित्रं आता जुन्या-नव्या प्रतिमांचा खेळ अधिक सरसपणे खेळत आहेत.

तिहेरी चित्रं आणि वर गोष्टसुद्धा!

राजमोहम्मद पठाण हे मूळचे मुद्राचित्रणकार. संगणकीय (डिजिटल) मुद्राचित्रणातही त्यांनी प्रगती केली आणि गेल्या साधारण १५ वर्षांत त्यांनी अनेक डिजिटल मुद्राचित्रं केली, त्यांचं वैशिष्टय़ म्हणजे या चित्रामध्येच दोन उभ्या पट्टय़ा आणि त्या पट्टय़ांवर निराळी चित्रं अशी रचना त्यांनी केली. समोरून पाहिल्यास मधलं चित्र आणि डावी-उजवीकडून पाहिल्यास आणखी दोन चित्रं दिसू शकतात. पठाण यांच्या नव्या चित्रांचं प्रदर्शन लायन गेट परिसरात (शहीद भगतसिंग मार्गावर नौदल गोदीतल्या दुर्लक्षित घडय़ाळ-टॉवरच्या बरोब्बर समोर असलेल्या) ‘ग्रेट वेस्टर्न बिल्डिंग’मध्ये पहिल्या मजल्यावरल्या ‘गॅलरी बियॉण्ड’ या कलादालनात ९ डिसेंबपर्यंत भरलं आहे. त्याचं वैशिष्टय़ म्हणजे, या चित्रांसह -अगदी चित्रांवरच- काही गोष्टीसुद्धा आहेत! या सर्व गोष्टी आजच्या काळाविषयी व्यंग्यात्मपणे टीका करणाऱ्या आहेत. ‘चांदोबा’ आदी मासिकांतल्या गोष्टींसारख्या सुरू होणाऱ्या या गोष्टी सोप्प्या आणि साळसूद वाटल्या, तरी माणसानं आज स्वत:चीच किती फसवणूक चालवली आहे, याविषयीचं भाष्य त्यात आहे. ही गोष्ट वाचली की चित्रं केवळ निमित्तमात्र ठरतात. पण तरीही, या रंगबिरंगी चित्रांचा आकर्षकपणा लक्षात राहातोच.