सेवा कंपन्यांना प्रतिदिन ३०/४० दूरध्वनी

५०० व १००० रुपयांच्या नोटा रद्द झाल्याने माजलेल्या चलनकल्लोळात विविध बँकांतील नोटा मोजणारी यंत्रे बिघडण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. या यंत्रांची काळजी वाहणाऱ्या विविध कंपन्यांना प्रतिदिन ३० ते ४० कॉल्स येत आहेत. या यंत्रांशिवाय मोठी रक्कम मोजण्यात बँकांना अडचणी येत आहेत. त्यामुळे रात्रंदिवस राबून या सेवा कंपन्यांना यंत्रांची दुरुस्ती करावी लागत आहे.

बनावट नोटा ओळखण्याबरोबरच त्या मोजण्याचे काम करणारी यंत्रे सर्वच बँकांकडे आहेत. प्रामुख्याने रोखपालांकडे ही यंत्रे असतात. परंतु ९ नोव्हेंबरपासून सुरू झालेल्या चलनकल्लोळामुळे बाद झालेल्या नोटा भरण्यासाठी नागरिकांनी बँकांमध्ये रांगा लावल्या आहेत. या यंत्रांचा इतर दिवशी मुबलक वापर होतो. परंतु आता सलग वापर होत असल्यामुळे ही यंत्रे नादुरुस्त झाली. बँकेच्या एका शाखेत साधारणत: दोन ते तीन यंत्रे असतात. परंतु ही यंत्रे नादुरुस्त होत असल्यामुळे सेवा कंपन्यांना तात्काळ बोलावून घेतले जात आहे. सेवा कंपन्यांकडून आतापर्यंत वर्षांतून तीन ते चार वेळा किंवा बँकेतून तक्रार आल्यानंतरच सेवा दिली जात होती. आता मात्र आम्हाला सलग काम करावे लागत आहे, असे यापैकी सेवा कंपनी असलेल्या दिशा सव्‍‌र्हिसेसच्या कर्मचाऱ्याने सांगितले. बँक ऑफ महाराष्ट्रच्या जोगेश्वरी पश्चिम बँकेत अशी सेवा देण्यासाठी हा कर्मचारी आला होता. आज सकाळपासून आपण आठ ठिकाणी या यंत्रांच्या दुरुस्तीसाठी गेलो. या यंत्रावर खूपच ताण पडत आहे. आणखीही आपल्याला काही ठिकाणी जायचे आहे. घरी पोहोचेपर्यंत रात्र होते, असेही हा कर्मचारी म्हणाला. नोटा मोजण्याची यंत्रे बिघडल्याच्या तक्रारी ९ नोव्हेंबरनंतरच वाढल्याचेही त्याने सांगितले.

चलनकल्लोळात सामान्य नागरिक भरडला जाऊ नये, यासाठी बँकांनी काळजी घेतली आहे. बँक ऑफ महाराष्ट्रच्या जोगेश्वरी शाखेच्या व्यवस्थापक स्वत: काऊंटरवर बसून नोटा बदलून देण्याबाबत प्राथमिकता पूर्ण करीत होत्या. अगदी सौजन्याने नागरिकांना समजावून सांगत होत्या. या बँकेत चार काऊंटर उघडण्यात आल्याने नागरिकांना अध्र्या तासाच्या अंतराने पैसे मिळत असल्याचे चित्र दिसून आले. अशीच परिस्थिती एचडीएफसीच्या वर्सोवा लिंक रोडवरील शाखेतही दिसत होती. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अंधेरीतील शाखेबाहेरही नागरिकांनी तुडुंब गर्दी केली होती. परंतु सारे काही शिस्तीत सुरू असल्याचे दिसून आले. काही बँकांनी नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था केली होती. बँकेतील कर्मचारी अर्ज कसा भरायचा आणि त्यासाठी कुठली कागदपत्रे हवी आहेत, याचीही माहिती देत होते.