News Flash

भाजप हायटेक प्रचाराचे रान उठवणार; देशभर कॉल सेंटरचे जाळे

‘फिर एक बार मोदी सरकार’ असा संकल्प करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने जय्यत तयारी केली.

(संग्रहीत छायाचित्र)

|| सौरभ कुलश्रेष्ठ

‘फिर एक बार मोदी सरकार’ असा संकल्प करून लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी भाजपने जय्यत तयारी केली असून प्रत्येक चार लोकसभा मतदारसंघांच्या एका गटासाठी (क्लस्टर) एक कॉल सेंटर कार्यान्वित करण्यात आले आहे. मोदी सरकारच्या योजनांच्या देशभरातील २२ कोटी लाभार्थ्यांची मतदारसंघनिहाय यादी या कॉल सेंटर्सकडे सोपवण्यात आली असून, ‘हा लाभ मोदी सरकारमुळेच मिळाला’ याची जाणीव करून देण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागणार आहेत.

ग्रामीण भागात व शेतकऱ्यांमध्ये असंतोष असल्याचे चित्र माध्यमांद्वारे वारंवार मांडले जात असून तीन राज्यांमधील विधानसभा निवडणुकांतील पराभवामुळे भाजप अडचणीत असल्याची चर्चाही सुरू झाली आहे. या पाश्र्वभूमीवर प्रचारासाठी कार्यकर्त्यांबरोबरच कॉल सेंटरचाही उपयोग करण्याचे भाजपने ठरवले आहे. मोदी सरकारच्या उज्ज्वला, सौभाग्य, पंतप्रधान आवास योजना अशा विविध योजनांचे २२ कोटी लाभार्थी हे आपले संभाव्य मतदार असल्याचे भाजपने निश्चित केले असून त्यांच्याशी सतत संवाद हे धोरण ठेवण्यात आले आहे.

देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघांची विभागणी प्रत्येकी चार मतदारसंघांच्या एक गटात करण्यात आली आहे. अशा प्रत्येक गटासाठी एक कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. मतदारसंघांचा आकार-मतदारसंख्या लक्षात घेऊन प्रत्येक कॉल सेंटरमध्ये २०० ते ५०० तरुण-तरुणींना नेमण्यात आले आहे. प्रत्येक कॉल सेंटरला त्यांच्या अखत्यारीतील लोकसभा मतदारसंघातील मोदी सरकारच्या लाभार्थ्यांची यादी देण्यात आली आहे. मतदान होईपर्यंत या लाभार्थ्यांशी सतत संवाद साधण्यात येईल. कॉल सेंटरमधून जाणाऱ्या संदेशाबरोबरच भाजपचे कार्यकर्तेही या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधत आहेत. एका कार्यकर्त्यांकडे सरासरी चार लाभार्थी असे समीकरण त्यासाठी ठरवण्यात आले आहे. या भेटींची नोंद या कार्यकर्त्यांनी ‘नमो अ‍ॅप’मध्ये करायची आहे. अशा रीतीने सतत संवादातून मोदी सरकारच्या विरोधात सुरू असलेल्या प्रचाराला उत्तर देता येईल, असा भाजपचा विचार आहे.

मोदी सरकारच्या लाभार्थ्यांबरोबरच भाजपचे ११ कोटी ऑनलाइन सदस्य झाले आहेत. या मंडळींशीही संवाद साधण्याची जबाबदारी कॉल सेंटरकडे देण्यात आली आहे. लाभार्थी आणि ११ कोटी ऑनलाइन सदस्यांशी सतत संवादातून जवळीक साधून पुन्हा मोदी सरकारसाठी मतदान करण्यास त्यांचे मन वळवता येईल आणि दिल्लीत पुन्हा भाजपचे सरकार आरूढ होईल, असे गणित भाजपने मांडले आहे.

देशभरात मोदी सरकारच्या योजनांचे २२ कोटी लाभार्थी आहेत. २०१४ मधील निवडणुकीत भाजपला १७ कोटी मतदान झाले होते. आता या सर्व २२ कोटी लोकांपर्यंत पक्ष-कार्यकर्ते पोहोचवण्याचे उद्दिष्ट पक्षाने ठेवले आहे. त्यासाठी कॉल सेंटरच्या माध्यमातून लाभार्थ्यांशी वारंवार संवाद साधला जाईल. मोदी सरकारच्या योजनेचा लाभ मिळाल्याने पुन्हा मोदी सरकार येण्यासाठी भाजपला मतदान करण्याचे साकडे घातले जाईल. शिवाय कार्यकर्तेही या लाभार्थ्यांशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधतील.   – सुनील देवधर, राष्ट्रीय सचिव, भाजप

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 26, 2019 2:17 am

Web Title: cyber war in indian general election 2019
Next Stories
1 शस्त्रक्रियेनंतर पाच जणांना दृष्टिदोष
2 कार्यकर्त्यांना रोखा अन्यथा कारवाई!
3 सरकार देर आए, पर दुरुस्त आए – राज ठाकरे
Just Now!
X