News Flash

Cyclone Tauktae : अरबी समुद्रात ९३ बेपत्ता

‘तौक्ते’मुळे तराफे भरकटले : नौदल, तटरक्षक दलाकडून ३१७ कर्मचाऱ्यांची सुटका

‘तौक्ते’मुळे तराफे भरकटले : नौदल, तटरक्षक दलाकडून ३१७ कर्मचाऱ्यांची सुटका

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात भरकटलेल्या तीन तराफ्यांसह (बार्ज) एका तेलफलाटावरील एकूण ३१७ कर्मचाऱ्यांची नौदल आणि तटरक्षक दलाने मंगळवारी सुखरूप सुटका केली. अद्याप ३९० कर्मचारी अडकलेले  आहेत. मात्र, त्यातील २९७ कर्मचारी सुरक्षित असल्याचे भारतीय संरक्षण दलांकडून स्पष्ट करण्यात आल्याने उर्वरित ९३ कर्मचारी बेपत्ता असल्याचे समोर आले आहे.

तौक्ते चक्रीवादळाने रौद्ररूप धारण केल्याने अरबी समुद्राला उधाण आले होते. त्यामुळे ७०७ कर्मचाऱ्यांचा समावेश असलेले तीन तराफे आणि एक तेलफलाट भरकटले. त्यात पी ३०५ तराफ्यातील २७३, गॅल कन्स्ट्रक्टरमधील १३७, एसएस-३ मधील १९६ आणि सागर भूषण तेलफलाटावरील १०१ जणांचा समावेश होता, असे नौदलाने सांगितले.

ओएनजीसीच्या सेवेत असलेल्या ‘पी ३०५’ तराफ्यातील २७३ पैकी १८० कर्मचाऱ्यांची मंगळवारी संध्याकाळपर्यंत सुटका करण्यात आली. तसेच गॅल कन्स्ट्रक्टर तराफ्यातील सर्व १३७ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली. तटरक्षक दलाच्या दोन चेतक हेलिकॉप्टर्सच्या मदतीने या १३७ कर्मचाऱ्यांना किनाऱ्यावर आणण्यात आले.

‘पी-३०५’ तराफा मुंबईपासून समुद्रात सुमारे ३५ सागरी मैल अंतरावर बुडाला. या तराफ्यातून १८० जणांची सुटका करण्यात आली. आयएनएस बेटवा, आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता या युद्धनौका शोध आणि मदतकार्यात दाखल झाल्या. नौदलाची आयएनएस तलवार युद्धनौकाही मदतकार्यात दाखल झाली असून, समन्वयकाची भूमिका पार पाडत आहे.

तीन तराफ्यांबरोबरच सागर भूषण हे तेलफलाटही भरकटले होते. त्यात ओएनजीसीचे ३७ कर्मचारी आणि ६४ कंत्राटी कर्मचाऱ्यांचा समावेश होता. हे कर्मचारी सुरक्षित असल्याचे सांगण्यात आले.

समुद्रात वेगवान वाऱ्यामुळे नौदलाला बचावकार्य राबविण्यात अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. मुसळधार पावसात सोमवारी मध्यरात्रीपासून बचावकार्य सुरू आहे. बॉम्बे हाय येथील अफकॉन या कंत्राटदाराकडील कर्मचारी पी ३०५ तराफ्यावर होते. सोमवारी पहाटे सोसाटय़ाचा वारा आणि खवळलेल्या समुद्रामुळे तराफ्याचे नांगर तुटून ते समुद्रात भरकटले. या तराफ्यावरून सोमवारी सकाळी मदतीसाठी संपर्क साधण्यात आला. जीवरक्षक जॅकेट घालून कर्मचाऱ्यांनी खवळलेल्या समुद्रात उडय़ा मारल्या. अनेक तास कर्मचारी खवळलेल्या समुद्रात या जॅकेटच्या आधारे तरंगत मदतीची प्रतीक्षा करत होते. सोमवारी सायंकाळी ४ वाजण्याच्या सुमारास नौदलाची आयएनएस कोची युद्धनौका मदतीसाठी दाखल झाली. मात्र समुद्राने रौद्र रूप धारण केल्यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. सोमवारी रात्रभर नौदलाकडून कर्मचाऱ्यांची शोधमोहीम सुरू होती. मात्र अंधार आणि प्रचंड मोठय़ा लाटा यामुळे शोध घेताना अडचण येत होते. मंगळवारी सकाळी वादळाचा प्रभाव कमी झाल्यावर नौदलाच्या मोहिमेला वेग आला.

तराफा म्हणजे काय?

समुद्रात कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी किंवा सामान ठेवण्यासाठी तराफे (बार्ज) उभारले जातात. त्याला इंजिन नसते. अन्य जहाजच्या मदतीने ते एका ठिकाणाहून अन्यत्र हलविले जाते. खोल समुद्रात ते नांगरून ठेवले जाते. अफकॉन कंपनीचा तराफा बॉम्बे हायनजीक नांगरून ठेवण्यात आला होता. तौक्ते चक्रीवादळात हा तराफा समुद्रात भरकटून दुर्घटना घडली. गॅल कन्स्ट्रक्टर तराफा नांगर तुटून समुद्रात भरकटला.

मदतकार्यात अडथळे

गेल्या चार दशकांतील हे सर्वात अवघड मदतकार्य आहे. आयएनएस तलवार, बेतवा, कोलकाता, कोची या युद्धनौका मदतकार्यात सहभागी झाल्या आहेत. अंधार, ८ ते १० मीटर उंच लाटा, वेगवान वारा यामुळे बचावकार्यात अडथळे येत होते. मंगळवारी सकाळपासून मदतकार्यात हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. सर्व कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करेपर्यंत ही मोहीम सुरू राहील, असे नौदलाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

‘पी ३०५’ या तराफ्यावरील २७३ पैकी १८० जणांची सुटका करण्यात यश आले आहे. गॅल कन्स्ट्रक्टरमधील सर्वच्या सर्व १३७ कर्मचाऱ्यांची सुटका करण्यात आली आहे. एसएस- ३ तराफा आणि सागर भूषण तेल फलाटावरील अनुक्रमे १९६ व १०१ जण सुखरूप आहेत.

– कमांडर मेहुल कर्णिक, प्रवक्ते, भारतीय संरक्षण दले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 19, 2021 2:38 am

Web Title: cyclone tauktae 93 missing in arabian sea
Next Stories
1 तीन दिवसांनंतर लसीकरण पूर्ववत
2 ‘गेट वे ऑफ इंडिया’च्या तटबंदीला धक्का
3 शेकडो बोटी वादळात उद्ध्वस्त
Just Now!
X