मुंबई : खवळलेला समुद्र, मिट्ट अंधार, घोंघावणारा वारा अशा भयावह परिस्थितीत तराफ्यांवरील कर्मचाऱ्यांनी तब्बल १६ तास लाटांशी झुंज दिली. शेवटच्या क्षणापर्यंत जगण्याची आशा सोडायची नाही, ही एकच गोष्ट ध्यानात ठेवून ते लाटांवर तरंगत होतो. नौदलामुळे जीव वाचला, अशा भावना पी ३०५ तराफ्यावरील कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.

तराफा (बार्ज) नांगरापासून तुटल्यावर सोमवारी पहाटे त्यांत पाणी भरू लागले. दुपारच्या सुमारास तराफा बुडू लागल्यावर अनेक कर्मचाऱ्यांनी जीवरक्षक जॅकेट घालून समुद्रात उडय़ा मारल्या. तराफा बुडण्यापूर्वी मदतीसाठी संदेश पाठवले होते. मात्र दुपारी वादळ मुंबईच्या दिशेने सरकले होते. त्याच्या प्रभावाने मोठय़ा लाटा उसळत होत्या. सरासरी ताशी १०८ कि.मी. वेगाने वारे किनाऱ्यावर वाहात होते. तरफ्यावरील शेकडो कर्मचाऱ्यांनी जीवरक्षक जॅकेट, तरंगताना मिळेत तो आधार घेऊन भर समुद्रात मृत्यूशी झुंज दिली.

आम्ही जीवरक्षक जॅकेट परिधान करून समुद्रात उडय़ा मारल्या. कोणीतरी वाचविण्यासाठी येईल या आशेवर तरफ्याच्या तिसऱ्या मजल्यावरून सुमारे ३० फूट उंचीवरून स्वतला समुद्रात झोकून दिले. त्यामध्ये पायाला दुखापत झाली. रक्तबंबाळ पाय घेऊन १६ ते १७ तास पाण्यात तरंगत होतो. माझ्याबरोबर असलेले इतर भरकटत दूर गेले. रात्री जवळपास कोणी असण्याची आशाही दिसत नव्हती. त्यावेळी आपले जगणे अवघड आहे असेच वाटत होते. आई, तीन वर्षांची मुलगी आणि नऊ वर्षांच्या मुलाचा चेहरा डोळ्यासमोर तरळत होता. एकदाच त्यांना भेटता यावे ही इच्छा होती. सोसाटय़ाचा वारा आणि लाटांचा मारा सहन करत रात्रभर पाण्यात तरंगत होतो. पोटात अन्न नसताना केवळ कुटुंबियांच्या आठवणीने तग धरून होतो. सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास नौदलाचे हॅलिकॉप्टर आल्यावर जीवात जीव आला. आणखी काही क्षण हॅलिकॉप्टर पोहचले नसते, तर मृत्यू निश्चित होता, अशी भावना मृत्यूच्या दाढेतून परतलेले सतीश नरवाल यांनी व्यक्त केली. मूळ हरियाणा येथील ३२ वर्षीय नरवाल हे गेल्या सात-आठ महिन्यांपासून तराफ्यावर काम करत होते.

पी ३०५ या तराफ्यावर मेकॅनिकचे काम करणारे संदीप कुमार हे मूळचे उत्तरप्रदेशातील रहिवासी आहेत. सोमवारी सायंकाळच्या सुमारास नौदलाची युद्धनौका पोहोचली. मात्र वारा जोराचा असल्याने युद्धनौका जवळ येईपर्यंत आम्ही दूर फेकले जात होतो. रात्रभर पाऊस सुरू होता. कसेतरी तग धरून होतो. नौदलाची युद्धनौका दिसत होती. मात्र तिच्यापर्यंत पोहोचता येत नव्हते, असे संदीप यांनी सांगितले.

गॅल कन्स्ट्रक्टर या तराफ्यावर अविनाश अडके हा तरूण अडकला होता. तो फायरमन म्हणून कार्यरत होता. चक्रीवादळामुळे तराफा नांगरापासून तुटून नियंत्रणाबाहेर गेला. मदतीसाठी जहाजे जवळ येत होती. मात्र खवळलेल्या समुद्रामुळे अडचणी येत होत्या. तराफ्यामध्ये पाणी भरत होते. मोटरद्वारे पाण्याचा उपसा चालू ठेवला होता. या वादळातून सुटका होणार नाही असेच वाटत होते. नौदल आणि तटरक्षक दलाशी मदतीसाठी सतत संपर्क साधत होतो. शेवटी मंगळवारी आम्हाला सुखरूप बाहेर काढण्यात आले, असे अविनाश याने सांगितले.