अरबी समुद्रात बुडालेल्या ‘पी ३०५’ तराफ्यावरील ४९ कर्मचाऱ्यांचा शोध सुरूच

मुंबई : तौक्ते चक्रीवादळामुळे अरबी समुद्रात बुडालेल्या ‘पी ३०५’ या तराफ्यावरील २६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह बुधवारी सापडले. नौदलाने आतापर्यंत या तराफ्यावरील १८६ कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका केली असून, अन्य ४९ जणांचा शोध सुरू आहे.

तौक्ते चक्रीवादळाने रौद्र रूप धारण केल्याने अरबी समुद्रात ‘पी ३०५’, गॅल कन्स्ट्रक्टर आणि एसएस-३ हे तीन तराफे तसेच सागर भूषण तेलफलाट भरकटला. नौदलाने मोठी शोधमोहीम राबवत ‘पी ३०५’ तराफ्यातील १८६ जणांची सुखरूप सुटका केली, तसेच अन्य दोन तराफे आणि तेलफलाटावरील अन्य ४३४ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात यश आले.

चक्रीवादळामुळे सोमवारी बॉम्बे हायनजीक ‘पी ३०५’ हा तराफा समुद्रात बुडाला. या तराफ्यावरील २६१ कर्मचाऱ्यांनी प्राण वाचविण्यासाठी जीवरक्षक जॅकेट परिधान करून समुद्रात उड्या मारल्या. त्यातील १८० कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली होती. उर्वरित बेपत्ता कर्मचाऱ्यांचा शोध मंगळवारी रात्रीपर्यंत लागला नव्हता. मंगळवारी रात्री उशिरा आणि बुधवारी दिवसभरात आठ कर्मचाऱ्यांना वाचवण्यात नौदल आणि तटरक्षक दलाला यश मिळाले. त्यातील सहा कर्मचारी ‘पी- ३०५’ तराफ्यावरील असून, दोघेजण ‘वरप्रदा’ नौकेवरील आहेत. ‘पी-३०५’ तराफ्यावरील २६ कर्मचाऱ्यांचे मृतदेह सापडले. अद्याप ४९ जण बेपत्ता असून, त्यांचा शोध सुरू आहे.

आयएनएस कोची ही युद्धनौका सुखरूप सुटका केलेल्या कर्मचाऱ्यांना घेऊन बुधवारी सकाळी मुंबईतील नौदल डॉकयार्ड येथे दाखल झाली. ‘पी ३०५’ या तराफ्याशिवाय गॅल कन्स्ट्रक्टर या तराफ्यात १३७ कर्मचारी आणि एसएस-३ येथे १९६ जण अडकले होते. या सर्व कर्मचाऱ्यांना नौदल आणि तटरक्षक दलाने वाचवले.

चक्रीवादळाची पूर्वकल्पना असल्याने नौदलाने आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्याची तयार करून ठेवली होती. नौदलाकडे मदतीसाठी संपर्क करण्यात आल्यावर सोमवारी सकाळीच युद्धनौका रवाना झाल्या. त्याच वेळी मुंबईच्या किनाऱ्याजवळ चक्रीवादळ होते. या वेळी वाऱ्याचा वेग १०० ते १२० किलोमीटर प्रतितास इतका प्रचंड होता. लाटा आठ मीटरपर्यंत उसळत होत्या. त्यामुळे या परिस्थितीत अडथळ्यांची शर्यत पार करून नौदलाच्या युद्धनौका पोहोचल्या, असे नौदलाचे अधिकारी मनोज झा यांनी सांगितले.

‘वरप्रदा’वरील ११ कर्मचारी बेपत्ता

तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात वरप्रदा ही नौका सापडली असून, त्यावरील २ कर्मचाऱ्यांना नौदलाच्या जवानांनी वाचवले. मात्र, अद्याप वरप्रदावरील ११ कर्मचारी बेपत्ता आहेत. ‘पी ३०५’ या तराफ्याचा शोध घेताना नौदलाला वरप्रदावरील कर्मचारी सापडले. वरप्रदा नौका तेलफलाट खेचून नेण्यासाठी वापरली जाते. ओएनजीसीच्या बॉम्बे हाय येथील तळावरील तेलफलाट खेचण्याचे काम ही नौका करत होती. तौक्ते चक्रीवादळाच्या तडाख्यात सोमवारी ते सापडले. हे जहाज बुडू लागल्यावर त्यावरील कर्मचाऱ्यांनी खवळलेल्या समुद्रात उड्या मारल्या. यातील दोन कर्मचारी जीवनरक्षक राफ्टच्या मदतीने समुद्रात तरंगत मदतीची वाट पाहत होते. ‘पी ३०५’ ही तराफा बुडू लागल्याचा संदेश मिळताच नौदलाची आयएनएस कोलकाता ही युद्धनौका खोल समुद्रात मदतीसाठी सोमवारी निघाली होती. यावेळी मुंबईपासून समुद्रात २० किलोमीटर अंतरावर दोनजण तरंगत असल्याचे आयएनएस कोलकाता युद्धनौकेवरील कर्मचाऱ्यांना दिसले. नौदलाने पुढील मोहीम थांबवून काही काळात या कर्मचाऱ्यांना सुखरूप वाचविले. दरम्यान वरप्रदा जहाज बुडाल्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यावरील उर्वरित ११ कर्मचाऱ्यांचा अद्याप थांगपत्ता लागला नाही.

शोधमोहीम अशी…

‘पी ३०५’ तराफा समुद्रात भरकटल्याची माहिती मिळताच नौदलाची आयएनएस कोची आणि आयएनएस कोलकाता या युद्धनौका मदतकार्यासाठी रवाना झाल्या. आयएनएस कोची या युद्धनौकेने दुर्घटनाग्रस्त तराफ्याजवळ पोहोचून सोमवारी सायंकाळी ४ च्या सुमारास मदतकार्य सुरू केले. सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास पहिल्या व्यक्तीला वाचविण्यात यश आले. त्यानंतर मंगळवारी रात्रभर आयएनएस कोचीकडून शोध आणि मदतकार्य सुरू होते. नौदलाच्या आयएनएस कोची, आयएनएस कोलकाता, आयएनएस बेतवा, आयएनएस तेग आणि आयएनएस बयास यांनी मदतकार्य केले. तसेच नौदलाचे पी८आय हे सागरी टेहळणी विमान, त्याचबरोबर चेतक, एएलए आणि सीकिंग ही हेलिकॉप्टर्सही मदतकार्यात सहभागी झाली होती. गुजरात किनाऱ्यानजीकच्या एसएस ३ आणि सागर भूषण येथील मदतकार्य आटोपून आयएनएस तलवार ही युद्धनौकाही ‘पी ३०५’ च्या कर्मचाऱ्यांचा शोध घेण्यासाठी रवाना झाली आहे.

अपघाती मृत्यूची नोंद

मुंबई : जलसमाधी घेतलेल्या तराफा पी ३०५ मधील चार कामगारांच्या मृत्यूप्रकरणी येलो गेट पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद घेतली.  नौदलाने वाचवलेल्या कामगारांचे जबाब नोंदविण्यास सुरुवात केली. संरक्षण दलाचे प्रवक्ते मेहुल कर्णिक यांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवार संध्याकाळपर्यंतच्या शोधमोहिमेत २६ जणांचे मृतदेह समुद्रातून बाहेर काढण्यात आले.

एक झुंज वाऱ्याशी…

खवळलेल्या सागराची विविध रूपे दररोज अनुभवणाऱ्या तराफ्यातील कर्मचाऱ्यांसाठी सोमवारचा दिवस भीषण ठरला. चक्रीवादळामुळे हजार जिव्हांनी गरजणाऱ्या समुद्राच्या रौद्र लाटांपुढे २६१ कर्मचारी असलेल्या ‘पी ३०५’ या तराफ्याने जलसमाधी घेतली. मृत्यूशी कित्येक तास झगडणाऱ्या या कर्मचाऱ्यांपैकी १८६ जणांची बुधवारी रात्रीपर्यंत सुखरूप सुटका करण्यात आली. त्यातील या कर्मचाऱ्याची वादळ-वाऱ्याशी झालेली झुंज त्याच्या डोळ्यांत उमटली होती.

उच्चस्तरीय चौकशीसाठी समिती

नवी दिल्ली : तौक्ते चक्रीवादळामुळे तीन तराफे भरकटल्याप्रकरणी चौकशीसाठी केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाने बुधवारी उच्चस्तरीय समिती नेमली. संरक्षण मंत्रालयाचे संयुक्त सचिव नझली जाफ्री शाईन, अमिताभ कुमार आणि एस. सी. एल. दास यांचा या समितीत समावेश आहे. ही समिती एका महिन्यात अहवाल सादर करेल, असे मंत्रालयाने स्पष्ट केले.

तिन्ही तराफे ‘अफकॉन’चे

‘पी ३०५’, गॅल कन्स्ट्रक्टर , एसएस-३ हे तिन्ही तराफे अफकॉन कंपनीचे आहेत, अशी माहिती ‘ओएनजीसी’ने दिली. ही कंपनी ‘ओएनजीसी’साठी कंत्राटदार म्हणून काम करत होती. अफकॉन कंपनीला वादळाची सूचना मिळाली होती का? कंपनीने कर्मचाऱ्यांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर का केले नाही, असे प्रश्न उपस्थित झाले आहेत.याबाबत माहितीसाठी अफकॉनशी वारंवार संपर्क करूनही त्यांनी कोणताच प्रतिसाद दिला नाही.