30 October 2020

News Flash

दाभोलकर हत्याप्रकरणी १८ नोव्हेंबपर्यंत आरोपपत्र

डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर १८ नोव्हेंबपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाईल

डॉ. नरेंद्र दाभोलकर

सीबीआयचा उच्च न्यायालयात दावा

मुंबई : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवर १८ नोव्हेंबपर्यंत आरोपपत्र दाखल केले जाईल, असे सीबीआयनेबुधवारी उच्च न्यायालयात सांगितले. या प्रकरणी सीबीआयने आतापर्यंत सात आरोपींना अटक केली आहे. त्यांच्यावर कर्नाटकातील ज्येष्ठ पत्रकार गौरी लंकेश यांची हत्या केल्याचाही आरोप आहे.

डॉ. दाभोलकर आणि कॉ. गोविंद पानसरे यांच्या हत्या प्रकरणाच्या तपासाबाबत नाराजी व्यक्त करीत त्यांच्या कुटुंबीयांनी त्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका केली आहे. दोन्ही गुन्ह्य़ांचा तपास न्यायालयाच्या देखरेखीखाली करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दाभोलकर हत्या प्रकरणाचा सीबीआय, तर पानसरे हत्या प्रकरणाचा तपास राज्याच्या विशेष तपास पथकामार्फत (एसआयटी) करण्यात येत आहे.

न्या. सत्यरंजन धर्माधिकारी आणि न्या. बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर बुधवारी या याचिकांवर सुनावणी झाली. त्या वेळी दाभोलकर हत्या प्रकरणाचा तपास पूर्ण करून आरोपींवर आरोपपत्र दाखल करण्यासाठी सीबीआयने एक मुदत ठरवली आहे. त्यानुसार १८ नोव्हेंबपर्यंत प्रकरणाचा तपास पूर्ण केला जाईल आणि आरोपपत्र दाखल केले जाईल, असा दावा सीबीआयतर्फे अतिरिक्त सॉलिसिटर जनरल अनिल सिंह यांनी केला. गौरी लंकेश यांच्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या हिंदू कट्टरपंथीय संघटनेचा सदस्य अमोल काळे याला दाभोलकर हत्या प्रकरणात अटक केली असल्याची माहितीही त्यांनी न्यायालयाला दिली. याआधी सचिन अंदुरेला अटक करण्यात आली होती. दाभोलकर यांच्यावर गोळी झाडणाऱ्या दोघांपैकी अंदुरे हा एक आहे.

दरम्यान, दाभोलकर हत्याप्रकरणी सीबीआयने ताब्यात घेतलेल्या आरोपींच्या कोठडीची मुदत संपली की त्यांना ताब्यात घेतले जाईल आणि ते पानसरे हत्या प्रकरणातही सामील होते का, याची चौकशी केली जाईल, असे राज्य सरकारच्या वतीने अ‍ॅड्. अशोक मुंदरगी यांनी न्यायालयाला सांगितले. या आरोपींचा आठवडाभरात ताबा मिळण्याची शक्यताही त्यांनी व्यक्त केली. आरोपींच्या चौकशीतून पुढे आलेली माहिती प्रसिद्धीमाध्यमांसमोर उघड करण्यावरून न्यायालयाने या वेळी राज्याच्या दहशतवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना फटकारले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 11, 2018 4:27 am

Web Title: dabholkar murder cbi likely to file charge sheet by november 18
Next Stories
1 मेट्रो-३ प्रकल्पग्रस्तांना घरे रिकामी करण्यास महिन्याची मुदत
2 #me too : महिलांच्या सुरक्षिततेसाठी नियम बदलण्याची तयारी
3 प्लास्टिकबंदीचा धाक नाहीसा
Just Now!
X