तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीत सुरु असलेल्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज मुंबईच्या आझाद मैदानावर मोठया संख्येने शेतकरी जमा झाले आहेत. राज्याच्या कानाकोपऱ्यातून शेतकरी आझाद मैदानावर पोहोचले आहेत. राज्यातल्या महाविकास आघाडी सरकारचा या शेतकरी आंदोलनला पाठिंबा आहे.

आझाद मैदानावर जमलेल्या हजारो शेतकऱ्यांच्या भोजनाची व्यवस्था करण्यासाठी अनेक संस्थांनी मदतीचा हात पुढे केला आहे. दादर येथील गुरुद्वाराने शेतकऱ्यांसाठी तब्बल २५ हजार पुलावची पाकिटे, फळं, डाळ आणि चपातीची व्यवस्था केलीय. गुरुद्वारातर्फे दुपारच्या जेवणामध्ये केळी, डाळ-चपातीचे वाटप केले जाईल.

शेतकऱ्यांसाठी अन्न वाटपाची व्यवस्था पाहणाऱ्या दलजित सिंग यांनी कृतज्ञतेची भावना व्यक्त केली आहे. अनेक राजकीय नेते सुद्धा मदतीसाठी पुढे आले असून, त्यांनी सुद्धा अन्न आणि पाण्याची व्यवस्था केली आहे.

आणखी वाचा- शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ उतरले फॅशन स्ट्रीटवरील दुकानदार; आझाद मैदानातील मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दुकान बंद आंदोलन

पालिकेकडून मोर्चेकऱ्यांना मदत

मोर्चासाठी रविवारी संध्याकाळपासूनच शेतकरी मोठय़ा संख्येने मुंबईत दाखल होण्यास सुरुवात झाली. परिणामी, आझाद मैदान परिसरात मोर्चेकऱ्यांची प्रचंड गर्दी झाली होती. मोर्चा लक्षात घेऊन पालिकेने स्वच्छतेसाठी सफाई कामगार, पिण्यासाठी पाणी आणि फिरत्या शौचालयांची व्यवस्था केली. त्याचबरोबर करोनाचा संसर्ग लक्षात घेऊन मोर्चेकरी शेतकऱ्यांना मुखपट्टी आणि सॅनिटायझरचे वाटपही सुरू केले. मोर्चामुळे होणारी गर्दी लक्षात घेऊन करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पालिकेने आझाद मैदान परिसरात वैद्यकीय शिबिराची  व्यवस्था करण्यात आली असून डॉक्टर आणि परिचारिकांचे एक पथक तेथे तैनात करण्यात आले आहे. गरज भासल्यास करोना चाचणीही करण्यात येत आहे, असे ‘ए’ विभाग कार्यालयातील साहाय्यक आयुक्त चंदा जाधव यांनी सांगितले.

कडेकोट बंदोबस्त आणि वाहतुकीतील बदल

संयुक्त शेतकरी कामगार मोर्चाच्या वतीने सोमवारी मुंबईत होणाऱ्या आंदोलनात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी पोलिसांनी कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवू नये यासाठी मुंबई पोलिसांनी आझाद मैदानाभोवती सुमारे शंभर अधिकारी आणि ५०० अंमलदारांचा फौजफाटा तैनात केला आहे. याशिवाय राज्य राखीव पोलीस दलाच्या नऊ तुकडय़ा या बंदोबस्तात असतील. ड्रोनद्वारे या संपूर्ण आंदोलनावर लक्ष ठेवले जाईल, असे पोलीस प्रवक्ते चैतन्य एस. यांनी स्पष्ट केले.