30 September 2020

News Flash

सुरक्षा नियमांचे दही!

विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करणाऱ्यांनी मंगळवारी सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले.

गोविंदांच्या सुरक्षेची खबरदारी घेण्याची हमी देण्यात आली असली तरी प्रत्यक्षात मंगळवारी मुंबईतील उत्सवाच्या ठिकाणी हे नियम पायदळी तुडवल्याचे दिसून आले. (छायाचित्रे : निर्मल हरिंद्रन, केविन डिसुझा)

दहीहंडी आयोजक, गोविंदा पथकांची बेपर्वाई कायम

सुरक्षेचे आव्हान आम्ही लिलया पेलण्यास सज्ज होणार आहोत, असे सांगून दहीहंडी उत्सवात उतरलेल्या गोविंदा पथकांनी आणि विविध ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करणाऱ्यांनी मंगळवारी सुरक्षेचे सर्व नियम धाब्यावर बसवले.  १४ वर्षांखालील मुलांचा गोविंदा पथकातील समावेश, त्यांना आयोजकांची परवानगी, दहीहंडीच्या ठिकाणी ‘मॅट’चा अभाव अशा अनेक गोष्टींतून गोविंदा पथके आणि आयोजकांची बेपर्वा वृत्ती दिसून आली.

उच्च न्यायालयाने उंचीच्या आणि वयाच्या संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या अटी शिथिल करत याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारवर सोपवला. राज्य सरकारने प्रतिज्ञापत्रात नमूद केलेल्या सुरक्षा उपायांचे पालन करणे बंधनकारक असल्याचे न्यायालयाने नमूद केले. मात्र प्रत्यक्षात नियमावलीमधील काही मोजक्याच नियमांच्या अंमलबजावणींची पूर्तता आयोजकांकडून करण्यात आल्याचे दिसून आले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि पर्यावरण विभागाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आयडियलच्या गल्लीमधील दहीहंडीमध्येच गाद्या म्हणजेच ‘मॅट’चा वापर केल्याचे आढळले. राजकीय पक्षांकडून आयोजित करण्यात आलेल्या मोठय़ा दहीहंडीच्याच ठिकाणी मनोऱ्यातील सर्वात वरच्या थरातील गोविंदासाठी ‘हार्नेस’ची व्यवस्था करण्यात आली होती. दादर आणि वरळी परिसरातील गल्ल्यांमधील अन्य उंच थराच्या हंडय़ांना मात्र कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था आयोजकांकडून करण्यात आली नव्हती. दादर परिसरात दहीहंडी फोडण्यासाठी एकामागून एक लागून पथकांची गर्दी होत होती. त्यामुळे येतील त्या पथकांना थर लावून सलामी द्यायला सांगणे आणि पारितोषिक देणे याचीच गडबड सुरू होती. या गोंधळामध्ये पथकातील सर्व सदस्यांची ओळखपत्रासह नोंद करून घेणे, गोविंदांच्या वयाच्या दाखल्याची तपासणी करणे, या गोष्टींकडे आयोजकांकडून दुर्लक्ष केले गेले.

सर्वात वरच्या थरातील गोिवदाला हार्नेसची व्यवस्था असलेल्या ठिकाणीच आयोजकांकडून ‘चेस्ट गार्ड’ पुरविण्यात येत होते. गोविंदा पथकाकडून गोविंदाला हेल्मेट व्यतिरिक्त कोणतेच सुरक्षेचे साधन पुरविण्यात आलेले नव्हते. बहुतांश गोविंदा पथकांमध्ये १४ वर्षांखालील मुले सहभागी झाली होती. ज्या गोविंदा पथकांकडे विमा नसेल त्यांनी उत्सव साजरा करण्यासाठी जाऊच नये असे दहीहंडी उत्सव समितीने केलेले आवाहनही बहुतांश गोविंदा पथकांनी धुडकावल्याचे दिसून आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 16, 2017 2:40 am

Web Title: dahi handi groups break safety rules in mumbai
Next Stories
1 बॅण्ड-बँजोचा कल्ला
2 रेल्वे स्थानकांवर अडीच हजार सीसीटीव्ही
3 चेंबूरमध्ये महिला पथकांची सर्वाधिक सलामी
Just Now!
X