मुंबईच्या चाकरमान्यांना लज्जतदार जेवण पुरवणाऱ्या डबेवाल्यांची ख्याती जगभर पोहोचली आहे. मात्र, यंदा खाण्याचे शौकीन असणाऱ्या पुणेकरांनी त्यांना निमंत्रण दिलं आहे. हे निमंत्रण थेट खाण्यासंदर्भात नसून ते दहिकाल्यानिमित्त आहे. होय! डबेवाल्यांचे गोविंदा पथक पुण्यात यंदा दहीहंडी उत्सव साजरा करणार आहेत. पुणे जिल्ह्यातील विविध भागांमधून त्यांना दहीहंडी फोडण्यासाठी निमंत्रणे मिळाली आहेत.

पुण्यातून निमंत्रणे आल्याने यंदाचा दहीहंडी उत्सवासाठी डबेवाल्या गोविंदा पथकाने खूपच मेहनत घेतली आहे. साधारण महिनाभरापासून आपल्या रोजच्या कामातून वेळ काढत ही मंडळी इतर गोविंदा पथकांप्रमाणेच सराव करत होती. त्यामुळे आता ‘हर तरफ है ये शोर आया गोकुल का चोर’ असं म्हणत मुंबईचा डबेवाला चोखंदळ पुणेकरांसमोर आपला खेळ सादर करण्यासाठी जाणार आहे.

पुणे शहरातील कोथरूड, भोसरी या भागांसह कामशेत, तळेगाव, चाकण, राजगुरूनगर या ग्रामीण भागातील बऱ्याच दहीहंडी मंडळांनी मुंबईच्या डबेवाला गोविंदा पथकाला दहीहंडी फोडण्यासाठी निमंत्रणे मिळाली आहेत, डबावाला असोसिएशनचे सचिव सावंत यांनी याची माहिती दिली.

लोकसत्ता ऑनलाईनशी संवाद साधताना सावंत म्हणाले, साधारण महिनाभरापासून आपल्या रोजच्या कामातून वेळ काढत या मंडळींनी प्रचंड मेहनत केली आहे. यंदा पुण्यातून निमंत्रणं आल्याने आमचे गोविंदा पथक उत्साहात असून थेट पुण्यात जात असून छाप सोडण्यासाठी सज्ज झाले आहे.