शहापूर तालुक्यातील आसनगाव-सावरोली रेल्वे स्थानकांदरम्यान एका झुडपात १८ वर्षीय दलित तरुणीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत शुक्रवारी आढळून आल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी मुंबई-नाशिक महामार्ग रोखून धरला. प्रणाली संजय गायकवाड असे या तरुणीचे नाव असून या प्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अकस्मीत मृत्युची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी शनिवारी शहापूर बंदचे आवाहन करण्यात आले आहे.
प्रणाली येथील सावरोली गावात आपल्या कुटुंबियांसह रहात होती. अंबरनाथ येथील आयटीआयमध्ये तीने ‘टूल मेकॅनिकल’च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला होता. त्यासाठी  दररोज पहाटे सावरोली पासून आसनगावपर्यंत रेल्वे मार्गालगत ती चालत जात असे. गुरुवारी सकाळी प्रणाली अंबरनाथ येथे गेली होती. मात्र सायंकाळी उशीरापर्यंत परतली नव्हती. त्यामुळे नातेवाईकांनी तीचा शोध सुरू केला. शुक्रवारी सकाळी तीचा मृतदेह याच मार्गावरील एका झुडपात सापडला. नातेवाईकांनी या प्रकरणी शहापूर पोलिसांत तक्रार केली असून तिचा मृतदेह शहापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आला होता. मात्र तेथे न्याय वैद्यक तज्ज्ञ नसल्याने शव विच्छेदनासाठी मृतदेह मुंबईच्या जेजे रुग्णालयामध्ये पाठवण्यात आला आहे, अशी माहिती शहापूर पोलिसांनी दिली.
प्रणालीच्या मृत्युमूळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आणि रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी करत मुंबई-नाशिक महामार्ग काही काळ रोखून धरला. मात्र पोलिसांनी समजूत काढल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले. याच परिसरात दोन महिन्यांपूर्वी एका महिलेवर चाकूने हल्ला करण्यात आला होता. मात्र, या घटनेचा छडा लावण्यात पोलिसांना अद्याप यश आलेले नाही.