थंडीमध्ये इन्फ्लुएन्झासारखे आजार वाढण्याची शक्यता असल्याने तापाच्या रुग्णांच्या सर्वेक्षणावर भर देण्याच्या सूचना आरोग्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

करोनामुळे होणाऱ्या मृत्यंचा दर कमी करणे आणि करोनाच्या संभाव्य दुसऱ्या लाटेच्या पूर्वतयारीबाबत आढावा राज्य कृती दल आणि मृत्यू लेखापरीक्षण विभागासोबत गुरुवारी घेतलेल्या बैठकीत ते बोलत होते.

राज्यात करोनाची दुसरी लाट शक्यतो येणार नाही, मात्र  खबरदारीची उपाययोजना करण्याबाबत यावेळी सविस्तर चर्चा झाली.

करोना रुग्णसंख्या नियंत्रणात असली तरी चाचण्यांची संख्या वाढविण्यात येणार असून तापाच्या रुग्णांचे सर्वेक्षण प्रभावीपणे करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

ज्या रुग्णालयांमध्ये मृत्यू दर अधिक आहे त्या ठिकाणी रुग्णालयस्तरावरच मृत्यू लेखापरीक्षण समिती नेमून शासनाला अहवाल देण्याचे यावेळी तज्ज्ञांनी सूचित केले. खासगी डॉक्टरांनी तापाच्या रुग्णांच्या लक्षणानुसार तातडीने चाचण्या करण्यासाठी प्राधान्य देण्याचे समितीने सुचविले आहे.

दरम्यान,करोनासाठी ज्या उपाययोजना राबविण्यात येत आहेत तसेच जी सुविधा निर्माण करण्यात आली आहे त्या सध्या सुरू राहतील. तसेच खासगी रुग्णालयांच्या ८० टक्के खाटा राखीव ठेवण्याचा निर्णयही लागू असेल, असे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. यावेळी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचे आवाहनही करण्यात आले.

चाचण्यांवर भर : किराणा दुकानदार, दूध विक्रेते, भाजीपाला विक्रेते, छोटे-मोठे व्यावसायिक, सार्वजनिक वाहतुकीतील कर्मचारी ज्यांचा लोकांशी कायम संपर्क येतो, अशा संसर्ग प्रसार घटकांच्या चाचण्यांवर भर देण्याचे निर्देश क्षेत्रीय पातळीवरील यंत्रणेला देण्यात आले आहेत.