गुन्हे शाखेचे अधिकारी सचिन वाझे यांच्यापासून जिवाला धोका संभवतो. त्यामुळे या प्रकरणातील सर्व महत्त्वाच्या साक्षीदारांना सुरक्षा पुरवावी, अशी मागणी हिरेन कुटुंबाने मुंबई पोलीस आयुक्त आणि राज्य दहशतवादविरोधी पथकाकडे (एटीएस) केली.

व्यावसायिक मनसुख हिरेन यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात एटीएसने ७ मार्चला हत्येचा गुन्हा नोंदवला. मनसुख यांच्या कुटुंबाने दिलेल्या जबाबाआधारे एटीएसने ही कारवाई केली. एटीएसला जबाब देताना कुटुंबाने मनसुख यांची हत्या घडल्याची खात्री असल्याचे सांगितले. तसेच ही हत्या वाझे यांनी केल्याचा संशयही व्यक्त केला. या घडामोडीनंतर ८ मार्चला कुटुंबाने मुंबई पोलीस आयुक्त, एटीएसच्या तपास अधिकाऱ्याला उद्देशून पत्र लिहिले. संशय व्यक्त केल्याने वाझे यांच्याकडून कु टुंबाच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो. व्यवसायानिमित्त घराबाहेर पडणे क्रमप्राप्त आहे.मुले शिकत आहेत. त्यामुळे सुरक्षा पुरवावी, अशी मागणी कु टुंबाने या पत्रात केली आहे.

वाझे यांना निलंबित करण्याची भाजपची मागणी

सचिन वाझे यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी भाजप आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.  वाझे यांची एकाच दिवसात दोन-दोन वेळा बदली करण्यात आली आणि अद्यापही ते मुंबई पोलिसांच्या सेवेत आहेत. नागरी केंद्रात बदली झाल्याचे दाखवून विशेष शाखेत (एसबी) बदली करण्यात आली आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त अशा आरोपी सोबत दोन तास चर्चा करतात, हे अत्यंत धक्कादायक आहे असे भातखळकर यांनी सांगितले.