कोठारी मेन्शन दुर्घटनेनंतर म्हाडाला जाग

आग लागल्यानंतर ढासळलेल्या कोठारी मेन्शन दुर्घटनेमुळे ‘म्हाडा’ला खडबडून जाग आली असून परवानगी दिल्यानंतरही मालक-भाडेकरूंच्या वादात रखडणाऱ्या इमारतीच्या दुरुस्तीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे परवानगी दिल्यानंतरही इमारतीची दुरुस्ती करण्यात टाळाटाळ करणाऱ्या मालकांची हजेरी घेण्याचा निर्णय ‘म्हाडा’ने घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून दुरुस्तीची परवानगी दिलेल्या इमारतींचा ‘म्हाडा’कडून आढावा घेण्यात येणार आहे. तर अशा इमारत मालकांना जरब बसावी म्हणून ‘म्हाडा’ने कोठारी मेन्शनच्या मालकाविरुद्ध पोलिसात तक्रार करावी, असे सूचित करणारे पत्र पालिकेने ‘म्हाडा’ला पाठविले आहे.

फोर्ट परिसरातील वालचंद हिराचंद रोडवरील कोठारी मेन्शनला गेल्या शनिवारी (९ जून) पहाटे भीषण आग लागली होती. इमारतीच्या पहिल्या मजल्यावर लागलेली आग हळूहळू चारही मजल्यावर पसरली. इमारतीमध्ये सावधगिरी म्हणून बसविण्यात आलेले टेकू आगीत भस्मसात झाले. त्यामुळे या इमारतीचा काही भाग ढासळला. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी ‘म्हाडा’ने इमारत मालकाला परवानगी दिली होती. त्यानंतर ‘म्हाडा’ने इमारतमालकाला दुरुस्तीबाबत स्मरणपत्रही पाठविले होते. मात्र मालक आणि भाडेकरू यांच्या वादामुळे इमारतीच्या दुरुस्तीचे काम रखडले होते. ‘म्हाडा’ने परवानगी दिल्यानंतरही या इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे ‘म्हाडा’ने इमारत मालकाविरुद्ध पोलिसांत तक्रार करावी, अशी सूचना करणारे पत्र पालिकेने ‘म्हाडा’ला पाठविले आहे.

मुंबईमध्ये मोठय़ा संख्येने दाटीवाटीने इमारती उभ्या असून दोन इमारतींमध्ये जेमतेम अर्धा-एक फूट मोकळी जागा आहे. दक्षिण मुंबईत दाटीवाटीने अशा अनेक इमारती उभ्या असून त्या शंभर वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या यापैकी अनेक इमारती आजघडीला धोकादायक बनल्या आहेत. म्हाडाने तपासणी करून अनेक उपकरप्राप्त इमारतींची दुरुस्ती करण्याबाबत इमारत मालकांना सूचनाही केली आहे. मात्र इमारत मालक आणि भाडेकरू यांच्यामध्ये वाद असल्यामुळे दुरुस्तीचे घोंगडे भिजत पडले आहे. काही इमारतींमध्ये पुनर्विकासाचे वारे वाहत आहेत. परंतु काही इमारतींचे मालक, तर काही इमारतींमधील भाडेकरू पुनर्विकासासाठी तयार नाहीत. तर विकासक आणि रहिवाशांमधील वाटाघाटी फिसकटल्याने काही इमारतींचा पुनर्विकास रखडला आहे. परिणामी या इमारती अत्यंत धोकादायक बनल्या आहेत. आता कोठारी मेन्शनमुळे धोकादायक अवस्थेत असलेल्या उपकरप्राप्त इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोठारी मेन्शन दुर्घटनेपासून धडा घेऊन ‘म्हाडा’ने दुरुस्तीसाठी परवानगी दिलेल्या इमारतींचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच परवानगी दिल्यानंतरही दुरुस्ती करण्यात आली नसेल तर ती करून घेण्यासाठी म्हाडाकडून इमारतमालकांकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे. अतिधोकादायक इमारतीसाठी ‘म्हाडा’चे धोरण असून या धोरणानुसार अतिधोकादायक इमारती रिकाम्या करून रहिवाशांची संक्रमण शिबिरात निवासाची तात्पुरती व्यवस्था करण्यात येते.

मात्र परवानगी देऊनही मालक इमारतीची दुरुस्ती करीत नसून अशा प्रकरणांची भविष्यात गांभीर्याने दखल घेण्यात येईल, असे ‘म्हाडा’ अधिकाऱ्याने सांगितले.

म्हाडाने मुंबईमधील काही इमारतीच्या दुरुस्तीसाठी मालकांना परवानगी दिली आहे. मात्र परवानगी देऊनही इमारतीची दुरुस्ती केली जात नाही हे कोठारी मेन्शन दुर्घटनेवरून उजेडात आले आहे. त्यामुळे दुरुस्तीची परवानगी दिलेल्या इमारतींचा आढावा घेण्यात येईल आणि इमारतीची दुरुस्ती करण्यात आली नसेल तर ती करून घेण्यासाठी मालकांकडे पाठपुरावा केला जाईल.

के. डी. जगदाळे, प्रमुख कार्यकारी अधिकारी, म्हाडा