मुंबईकरांची तहान भागविणारे तानसा आणि मोडक सागर धरण लवकरच ओसंडून वाहण्याच्या बेतात असून मुसळधार पावसामुळे वैतरणा नदीही दुथडी भरून वाहण्याची शक्यता आहे. या परिसरात पूरस्थिती निर्माण होण्याची चिन्हे लक्षात घेऊन पालिकेने वाडा तालुक्यातील २४, तर पालघर तालुक्यातील १९ गावांना धोक्याचा इशारा दिला आहे. या गावांमधील ग्रामस्थांना योग्य त्या सूचना देण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्याची व्यवस्था करावी, असे पालिकेने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे.

वैतरणा नदीवरील शहापूर तालुक्यातील खर्डी गावाजवळील मोडक सागर धरणातील पाण्याची पातळी १६०.८४२ घनमीटर इतकी असून सध्या धरणक्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे मोडक सागर धरण लवकरच पूर्ण भरून वाहण्याची शक्यता आहे. तानसा नदीवरील शाहपूर तालुक्यातील तानसा गावाजवळील तानसा धरणाची पाण्याची पातळी १२६.७८१ घनमीटर इतकी असून या परिसरातही सध्या मोठय़ा प्रमाणात पाऊस पडत आहे. त्यामुळे तानसा धरण कोणत्याही क्षणी ओसंडून वाहण्याची शक्यता आहे.

मोडक सागर आणि तानसा धरण कोणत्याही क्षणी ओसंडून वाहण्याची शक्यता लक्षात घेत पालिकेने वाडा तालुक्यातील २४, तर पालघर तालुक्यातील १९ अशा एकूण ४३ गावांना धोक्याचा इशारा देण्याची आणि ग्रामस्थांना सावध राहण्याची सूचना करण्याची विनंती पालिकेने ठाणे, पालघर जिल्ह्य़ांतील जिल्हाधिकारी, संबंधित पोलीस अधीक्षक, ठाणे आणि पालघर येथील तत्कालीन व्यवस्थापन कक्षाला पत्र पाठवून केली आहे.

या गावांना इशारा

धोक्याचा इशारा देण्यात आलेल्या गावांमध्ये वाडा तालुक्यातील दाधारे, जोशीपाडा (दाधारे), कळंबे, शेले (घाटालपाडा), तोळसे, पोंपरोली, धिंडेपाडा (सोनशीव) गाले, अनशेत, तुसे, सारशी, गंधारे, कोयना वसाहत (कोणे), गेट्स (बुद्रुक), शील, गेट्स खुर्द, अब्जे, आलमन, कुतल, बोरांदे, आवंधे, नाने, गलतरे, हमरापूर, तर पालघर तालुक्यातील सावरे, पाचुधारा, इंबुर-इरंबीपाडा, खडकीपाडा, मनोर, उधारपाडा, बहलोली, बोट, दहिसर मनोर, देवनीपाडा, कामलोली, विश्रामपूर, साखरे, ललटणे, उंचवली, कोरीचा पाडा, कोनपाडा, नवघर या गावांचा समावेश आहे.