देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई आणि महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी असलेल्या पुण्याला रेल्वे मार्गाने जोडणाऱ्या प्रवाशांच्या लाडक्या ‘डेक्कन क्वीन’ अर्थात ‘दख्खनच्या राणी’ला आज रविवार १ जून रोजी ८४ वर्षे पूर्ण झाली आहेत. प्रवाशांच्या या लाडक्या ‘डेक्कन क्वीन’चा आणि पंजाबमेलचा १०३ वा वाढदिवस आज भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते केक कापून जल्लोषात साजरा करण्यात आला. १ जून १९३० रोजी सुरू झालेला ‘डेक्कन क्वीन’चा प्रवास आजही अव्याहतपणे सुरू असून मुंबई-पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ती आजही पहिली पसंती आहे. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, डॉ. देवीसिंह शेखावत, रेल्वे प्रवाशी ग्रुपच्या अध्यक्षा हर्षदा शहा यांनी हिरवा झेंडा दाखवून ‘डेक्कन क्वीन’ची रवानगी केली.
तेव्हाच्या ‘ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे’ने (जीआयपीआर) अर्थात आताच्या मध्य रेल्वेने ‘डेक्कन क्वीन’च्या रूपाने भारतातील पहिली डिलक्स रेल्वे सुरू केली. ही भारतातील पहिली अति जलद गाडी होती. सुरुवातीला या गाडीतून फक्त ब्रिटिश लोकच प्रवास करू शकत होते. गाडीतून प्रवास करण्याची भारतीयांना परवानगी नव्हती. पुढे १९४३ मध्ये या गाडीतून प्रवास करण्याची परवानगी भारतीयांना देण्यात आली. तेव्हापासून या गाडीकडे प्रवाशांचा जो ओघ सुरू झाला तो आजही कायम आहे.
विद्युत इंजिनावर चालणारी लांब पल्ल्याची पहिली गाडी, महिलांसाठी विशेष डबा जोडण्यात आलेली तसेच गाडीत स्वतंत्र ‘खान-पान डबा’ (डायनिंग कार) असलेली पहिली गाडी असे अनेक बहुमान ‘डेक्कन क्वीन’ला मिळाले आहेत. ही गाडी पहिल्यांदा सात डब्यांची होती, नंतर ही संख्या १२ झाली आणि सध्या ही गाडी १७ डब्यांची आहे. डेक्कन क्वीन गाडीने प्रवास करणारे प्रवासी आणि या गाडीचे एक भावनिक नाते निर्माण झाले आहे. ‘डेक्कन क्वीन’ म्हणजे नोकरी निमित्त दररोज एकत्र प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे एक कुटुंब झाले आहे. रविवार हा सुटीचा दिवस असला तरी १ जून रोजी मुंबई आणि पुणे येथे प्रवाशांकडून डेक्कन क्वीनचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे उत्साहात साजरा केला जोतो.