05 March 2021

News Flash

निकिता जेकबच्या जामिनावर आज निर्णय

अटकेच्या भीतीपोटी जेकब या घरातून निघून गेल्या.

(संग्रहित छायाचित्र)

ग्रेटा थनबर्ग हिचे शेतकरी आंदोलनाशी संबंधित ‘टूलकिट‘ समाजमाध्यमावरून प्रसारित केल्याच्या आरोपाप्रकरणातील संशयित अ‍ॅड निकिता जेकब यांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर करायचा की नाही याबाबतचा निर्णय मुंबई उच्च न्यायालय बुधवारी देणार आहे. तोपर्यंत जेकब यांना अटक होणार नाही, अशी हमी दिल्ली पोलिसांनी  न्यायालयाला दिली.

दिल्ली न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट बजावल्यानंतर तसेच दिल्ली पोलीस अटकेसाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर जेकब यांनी अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायमूर्ती प्रकाश नाईक यांच्यासमोर जेकब यांच्या याचिकेवर मंगळवारी सुनावणी झाली. त्या वेळी दिल्ली पोलिसांच्या ‘सायबर सेल’तर्फे जेकब यांच्या याचिकेला विरोध करण्यात आला. या प्रकरणी दुसऱ्या राज्यात गुन्हा दाखल असल्याने मुंबई उच्च न्यायालयाला जेकब यांना दिलासा देण्याचा अधिकार नाही, असा युक्तिवाद दिल्ली पोलिसांच्या वतीने हितेन वेणेगावकर यांनी केला.

दिल्ली येथील तीसहजारी न्यायालयाने जेकब यांच्याविरोधात अजामीनपात्र अटक वॉरंट बजावल्यानंतर ११ फेब्रुवारीला जेकब यांच्या गोरेगाव येथील घरातून त्यांचा संगणक, भ्रमणध्वनीसह काही कागदपत्रे ताब्यात घेण्यात आली.  जेकब यांचा तपशीलवार जबाबही नोंदवला. पोलीस त्यांना अटक करणार होते. मात्र सूर्यास्तानंतर महिलांना ताब्यात घेण्यास वा अटक करण्यास कायद्याने मनाई असल्याने दिल्ली पोलिसांनी जेकब यांना दुसऱ्या दिवशी सकाळी साडेदहा वाजता परत येऊ, असे सांगितले. दुसऱ्या दिवशी पोलीस त्यांच्या घरी पोहोचले त्या वेळी तपासात सहकार्य करण्याऐवजी त्या फरारी झाल्या, असे वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले.

दिल्ली न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी रीतसर अर्ज करता यावा यासाठीच जेकब यांना अटकेपासून तीन ते चार आठवडय़ांचा दिलासा देण्याची मागणी केली जात आहे, असा युक्तिवाद जेकब यांच्या वतीने अ‍ॅड्. मिहिर देसाई यांनी केला. तसेच अटकेच्या भीतीपोटी जेकब या घरातून निघून गेल्या. परंतु त्यांना अंतरिम दिलासा मिळाल्यानंतरही त्या तपासात सहकार्य करतील, असा दावाही करण्यात आला.

लाल किल्ल्यावरील घटना हत्याकांडच

दिल्ली पोलिसांचा आरोप

थनबर्ग हिचे ‘टूलकिट’ या प्रकरणी अटकेत असलेली पर्यावरणवादी दिशा रवी आणि जेकबसह खलिस्तानी चळवळीत सहभागी असलेल्यांनी तयार केले व समाजमाध्यमावरून ते प्रसारित केले, असा आरोप दिल्ली पोलिसांनी केला आहे. प्रजासत्ताकदिनी लाल किल्लय़ावर घम्डलेला प्रकार हा एकप्रकारे हत्याकांडच होते. त्यात ४०० हून अधिक पोलीस जखमी झाले, असा आरोप करून दिल्ली पोलिसांनी जेकब यांची याचिका फेटाळण्याची मागणी केली.

‘टूलकिट शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी’

‘टूलकिट’ केवळ जेकब यांनीच नव्हे, तर अनेकांनी तयार केले होते. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी ते तयार करण्यात आले होते. त्यात हिंसा करण्याबाबतचे वा प्रजासत्ताकदिनी लाल किल्लय़ावर झालेल्या घटनेबाबतचे भाष्य नाही, असेही देसाई यांनी न्यायालयाला सांगण्याचा प्रयत्न केला. थनबर्गच्या ‘ट्वीट’मुळे हा प्रकार उघडकीस आला. परंतु जेकबसारख्या तरूण पर्यावरणवादीवर देशद्रोहासारखे गंभीर आरोप लावणे योग्य नसल्याचे देसाई यांनी म्हटले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 17, 2021 12:14 am

Web Title: decision on nikita jacob interim pre arrest bail today abn 97
Next Stories
1 शिवसेनेचे शिवसंपर्क अभियान
2 महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी! अवघ्या ४३ टक्के आरोग्य सेवकांचे लसीकरण
3 टूलकिट प्रकरण: शंतनू मुळूक यांना जामीन मंजूर, निकिता जेकब यांच्या याचिकेवर उद्या निर्णय
Just Now!
X