वेतन करार आणि अन्य मुद्यांवरुन बेस्ट कामगार कृती समिती संप पुकारण्याच्या बेतात आहे. कामगारांच्या मागण्यांबाबत संप करावा की करु नये, यासाठी शुक्रवारी सर्व बेस्ट आगारांमध्ये मतदान घेण्यात आले. ही मतमोजणी शनिवारी होणार असून त्यावर संप करायचा की नाही, याचा निर्णय होईल, अशी माहिती कृती समितीने दिली.

बेस्ट कामगारांच्या मागण्यांविषयी प्रशासन सकारात्मक नसल्याने पुन्हा संप करण्यावर कृती समितीकडून विचार करण्यात आला. त्यासाठी २३ ऑगस्ट रोजी संपावर मुंबईतील बेस्टच्या सर्व आगारांमध्ये मतदान घेण्यात आले. मात्र या मतदानाला तीन आगारांमध्ये बेस्ट कामगार सेनेसह अन्य दोन ते तीन संघटनांनीही विरोध केला. वडाळा, गोरेगाव, गोराईत मतपत्रिका फाडण्याचा प्रयत्न झाला. कृती समितीचे नेते शशांक राव यांनी शनिवार २४ ऑगस्ट रोजी मतमोजणी होणार असल्याचे सांगितले.परळ येथील शिरोडकर हायस्कूलमध्ये सकाळी ९ वाजता मतमोजणी होईल. त्यानंतर बेस्ट संयुक्त कामगार कृती समितीची दुपारी बैठक  होणार आहे.

कामगार सेनेचा विरोध

‘मुंबई आद्योगिक संबंध अधिनियम रद्द झाल्यावर बेस्ट प्रशासन सर्व कामगार संघटनांसोबत चर्चा करु शकते. आमच्यासोबतही चर्चा सुरू असून बेस्टमधील इतर संघटनांशीही चर्चा होत असताना कृती समितीने संप करणे कितपत योग्य आहे,’ असा  सवाल बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष  सुहास सामंत यांनी केला.  शुक्रवारी झालेल्या मतदानाला बेस्ट कामगार सेनेसह भाजपप्रणित व अन्य बेस्ट कामगार संघटनांनीही विरोध दर्शविला आहे. आम्ही संप होऊ देणार नाही आणि संप झालाच तर आमचे कामगार संपात सामिल होणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.