वाहनविक्रीत दोन दशकांतील सर्वात मोठी घट; रोजगार कपातीचे संकट

मुंबई : गेल्या वित्त वर्षांत पाच वर्षांच्या तळात राहिलेल्या भारतीय अर्थव्यवस्थेवरील मंदीची छाया अधिक गडद होत आहे. चीन, अर्जेटिनामधील जागतिक अस्थिरतेच्या घडामोडींनी मंगळवारी येथील भांडवली बाजार पोळून निघाला.

गेल्या महिन्यात देशातील वाहन विक्रीने तब्बल दोन दशकांतील सुमार कामगिरी बजाविल्याच्या आकडेवारीने अर्थचिंतेत अधिक भर घातली. वारंवार उसळणारे सोने-चांदीचे दर व डॉलरसमोरील रुपयाचा सहामाही तळ हेही भारतीय अर्थस्थितीसमोर आव्हान म्हणून उभे राहिले आहे.

देशातील वाहन क्षेत्रात सलग नवव्या महिन्यात घसरण नोंदली गेली आहे. यंदाच्या जुलैमध्ये येथील वाहन निर्मिती कंपन्यांनी विक्रीतील गेल्या दोन दशकांतील मोठी विक्री घसरण नोंदवली. त्याचबरोबर चालू आर्थिक वर्षांच्या पहिल्या तीन महिन्यांतच तब्बल १५,००० रोजगार कपातीला या क्षेत्राला सामोरे जावे लागल्याचे मंगळवारी स्पष्ट झाले. जुलैमध्ये सर्वच गटातील वाहने वार्षिक तुलनेत दुहेरी अंक प्रमाणात खाली आली आहेत.

अर्जेटिनाच्या पेसो या चलनाचे सोमवारी अवमूल्यन १५ टक्क्यांपर्यंत झाल्याने तसेच तेथील भांडवली बाजारातील समभागांचे मूल्य ४८ टक्क्यांपर्यंत आपटल्याने येथील सेन्सेक्स व निफ्टी निर्देशांकाने महिन्यातील तळप्रवास अनुभवला. तसेच हाँगकाँगमधील तणावपूर्ण परिस्थितीमुळे चीनमधील व्यापार युद्ध भडकण्याची धास्ती निर्माण झाल्याने दोन्ही निर्देशांक एकाच व्यवहारात दीड टक्क्यांहून अधिक प्रमाणात खाली आले.