प्रसाद रावकर

करोनाबाधित रुग्ण आणि त्यांच्या संपर्कातील व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस कमी होत असून बहुतांशी संशयितांना त्यांच्या घरीच विलगीकरणात ठेवण्यात येते आहे. परिणामी, बहुसंख्य करोना काळजी केंद्रांमध्ये तुलनेत फारच कमी संशयित रुग्ण दाखल आहेत. ही बाब लक्षात घेऊन आता मुंबईत केवळ ५० करोना काळजी केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय प्रशासन पातळीवर घेण्यात आला आहे.

मुंबईमध्ये मार्चमध्ये पहिला करोनाचा रुग्ण सापडला आणि त्यानंतर सातत्याने करोनाबाधितांची संख्या वाढत गेली. करोना संसर्गाचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी करोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात असलेल्या अतिजोखमीच्या आणि कमी जोखमीच्या व्यक्तींची वर्गवारी करण्यात आली. या संशयित रुग्णांना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेत प्रशासनाने ठिकठिकाणी ‘३२८ करोना काळजी केंद्र-१’ सुरू केली, तर १७३ ‘करोना काळजी केंद्र-२’ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यातील ६० ‘करोना काळजी केंद्र-२’ आजघडीला कार्यान्वित करण्यात आली.

मुंबईतील ३२८ ‘करोना काळजी केंद्र-१’ची क्षमता ५० हजार ०७७ खाटा इतकी असून आजघडीला या केंद्रांमध्ये केवळ सहा हजार २५३ संशयित रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत या केंद्रांमध्ये एक लाख ३४ हजार ५४४ रुग्णांना दाखल करण्यात आले होते. विलगीकरणाचा काळ पूर्ण झाल्यानंतर या रुग्णांना घरी पाठविण्यात आले.

करोनाबाधितांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेत एकूण २४ हजार १२५ खाटा क्षमता असलेली १७४ ‘करोना काळजी केंद्र-२’ सुरू करण्याचा पालिकेचा मानस होता. त्यापैकी केवळ पाच हजार ०४० क्षमतेची ६० ‘करोना काळजी केंद्र-२’ सुरू करण्यात आली. आजघडीला या केंद्रांमध्ये केवळ एक हजार ७७५ करोना संशयित रुग्ण दाखल आहेत. आतापर्यंत तेथे २९ हजार ७४४ रुग्णांना तेथे दाखल करण्यात आले होते.

करोनाबाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात येऊ लागताच या दोन्ही केंद्रांमधील संशयित रुग्णांची संख्याही आटू लागली आहे. बहुतांश संशयित घरातच नियम पाळून विलगीकरणात राहण्याची तयारी दर्शवत आहेत. आजघडीला तब्बल एक लाख ९२ हजार ९५३ रुग्ण आपापल्या घरी विलगीकरणात आहेत.

दोन्ही विलगीकरण केंद्रांमध्ये मोठय़ा प्रमाणावर मनुष्यबळ कार्यरत आहे. मनुष्यबळ अधिक आणि रुग्णांची संख्या कमी अशी अवस्था केंद्रांमध्ये आहे. ही बाब लक्षात घेऊन आता पालिकेच्या एका प्रशासकीय विभागात संशयित रुग्णांसाठी दोन ‘करोना काळजी केंद्रे’ सुरू ठेवण्यात येणार आहेत. रुग्णसंख्या वाढल्यास तेथील अन्य केंद्रे सुरू करण्यात येणार आहे. अशा प्रकारे मुंबईतील ५० ‘करोना काळजी केंद्रे’ सुरू ठेवण्याचा पालिकेचा मानस आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांवरील ताणही हलका होऊ शकेल आणि खर्चावरही नियंत्रण येईल, असे पालिका अधिकाऱ्याने सांगितले.

करोना काळजी केंद्रांमध्ये एकूण क्षमतेच्या तुलनेत कमी संशयित रुग्ण दाखल आहेत. त्यामुळे एका विभाग कार्यालयाच्या हद्दीत दोनच करोना काळजी केंद्रे सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र दाखल असलेला शेवटचा रुग्ण घरी जाईपर्यंत संबंधित केंद्र बंद करण्यात येणार नाही.  भविष्यात रुग्णसंख्या वाढत असल्याचे लक्षात येताच गरजेनुसार तेथील बंद केंद्र सुरू करण्यात येईल.

– सुरेश काकाणी, अतिरिक्त महापालिका आयुक्त