प्रशासनातील आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची व्हॉट्सअ‍ॅपवर बदनामी केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेले अप्पर मुख्य सचिव अरविंद कुमार यांना बदलीची शिक्षा देण्यात आली असून, त्यांची महाराष्ट्र पेट्रोकेमिकल्स महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक या कनिष्ठ पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

वारंवार वादाच्या भोवऱ्यात सापडणारे अरविंद कुमार ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदी कार्यरत होते. काही दिवसांपूर्वी सनदी अधिकाऱ्यांच्या वॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज्याचे माजी मुख्य सचिव अजोय मेहता, स्वाधीन क्षत्रिय डी. के. जैन तसेच प्रवीण परदेशी आदी अधिकाऱ्यांबाबत बदनामीकारक मजकूर प्रसारित झाल्यामुळे एकच खळबळ उडाली होती.

मुख्य सचिव संजय कुमार यांनी या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्यानंतर अरविंद कुमार यांचे नाव समोर येताच त्यांची ग्रामविकास विभागाच्या अप्पर मुख्य सचिवपदावरून तडकाफडकी बदली करण्यात आली होती. तसेच कारणे दाखवा नोटीसही बजावण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना दुय्यम अशा पेट्रोकेमिकल्स महामंडळात पाठविण्यात आल्याची माहिती वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

नव्या नियुक्त्या..

अश्विनी कुमार यांची महसूल विभागाचे अपर मुख्य सचिव व विशेष कार्य अधिकारी म्हणून बदली करण्यात आली आहे. सीमा व्यास यांची नियुक्ती सामान्य प्रशासन विभागात प्रधान सचिव व विशेष चौकशी अधिकारी १ या रिक्त पदावर, तर ओ. पी. गुप्ता यांची नियुक्ती उच्च व तंत्रशिक्षण विभागात प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे.