News Flash

मृतांची माहिती प्राप्त होण्यास विलंब

‘रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली’ रखडली

मृतांची माहिती प्राप्त होण्यास विलंब
संग्रहित छायाचित्र

डिजिटल स्वरूपात माहिती उपलब्ध नसल्याने महापालिकेची अडचण; ‘रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली’ रखडली

शैलजा तिवले लोकसत्ता

मुंबई : रुग्णांसह त्यांच्यावरील उपचार, मृतांची माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध करून देणारा ‘रुग्णालय व्यवस्थापन माहिती प्रणाली’ (एचएमआयएस) हा प्रकल्प गेले कित्येक वर्षे रखडल्याचा फटका करोना साथीच्या उद्रेकात पालिका प्रशासनाला सहन करावा लागत आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाला असता तर पालिका रुग्णालयातील करोना रुग्णांच्या मृतांची माहिती डिजिटल स्वरूपात तात्काळ मृत्यू विश्लेषण समितीकडे वेळेत उपलब्ध झाली असती. परिणामी उपचारांचे, मृतांचे विश्लेषण करणेही सोपे होऊन भविष्यातील उपचाराची दिशा ठरविणे सोपे झाले असते. मात्र पालिका प्रशासनाच्या अनास्थेपोटी हा सुमारे १०० कोटी रुपयांचा प्रकल्प कागदावर आहे.

राज्यातील सर्वाधिक ५२८५ करोना मृत्यू मुंबईतील आहेत. करोनाबाधित मृतांची आकडेवारी नोंदविण्यापासून ते जाहीर करण्यापर्यंतच्या प्रक्रियेतील समन्वयाच्या अभावामुळे ८००हून अधिक मृत्यूंची नोंद झालीच नसल्याचे समोर आले. त्यानंतर पालिकेने १ जुलैपासून गूगलच्या माध्यमातून सर्व रुग्णालयांना मृतांची नोंद करण्याचे आदेश दिले.

मृतांची आकडेवारी वाढत असल्याने रुग्णाचे वय, मृत्यूमागील कारणे, उपचार यांचा आढावा घेण्यासाठी पालिकेने मृत्यू विश्लेषण समिती समिती नियुक्त केली. या समितीला सर्व रुग्णालयांकडून माहिती दिली जाते. मात्र ही माहिती पोहचण्यास बराच विलंब होत आहे. अजूनही १३६८ रुग्णांच्या मृत्यूची माहिती समितीकडे आलेली नाही. विश्लेषणातून मृत्यू रोखण्यासाठीच्या उपाययोजना समितीला सूचित करावयाच्या आहेत. माहितीअभावी विश्लेषण करून उपाययोजना सुचविण्यासही विलंब होतो. मृतांची सर्व कागदपत्रे गोळा करणे, स्कॅन करून पाठविणे हे काम ही वेळखाऊ असून आम्ही उपचाराकडे लक्ष देणार की या सर्व कामांच्या मागे लागणार, असा प्रश्न यावर पालिका रुग्णालयातील डॉक्टर उपस्थित करतात.

दुसरीकडे ही स्कॅन केलेली कागदपत्रे तपासून प्रत्येक रुग्णाची इत्थंभूत माहिती जमा करण्याचे काम समितीला करावे लागते. त्यात अनेकदा माहिती अपूर्ण असते. ती जमा करण्यात बराच वेळ जातो. त्यामुळे ही माहिती डिजिटल स्वरूपात उपलब्ध असती तर विश्लेषणावर अधिक चांगल्यारीतीने काम करणे शक्य झाले असते, अशी अडचण समितीने मांडली.

रुग्णांचा वयोगट, लक्षणे, दिलेले उपचार, गंभीर प्रकृती झालेला रुग्ण याची संपूर्ण माहिती डिजिटल स्वरूपात सध्याच्या घडीला

उपलब्ध असती तर मृतांच्या विश्लेषणामध्ये नक्कीच अडचणी आल्या नसत्या. काही मिनिटांमध्ये सर्व माहितीचे विश्लेषण करणे सोपे झाले असते, असे मत पालिका रुग्णालयातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.

अद्याप कागदावरच

चार वर्षांपूर्वी रुग्णांची वैयक्तिक, उपचार यासंबंधीची माहिती डिजिटल स्वरूपात साठविण्यासाठी एचएमआयएस प्रकल्पाची सुरुवात केली. संगणकांची उपलब्धता, किचकट प्रणाली, डॉक्टरांचे प्रशिक्षण यांमुळे हा प्रकल्प चार वर्षे झाले तरी कागदावर आहेत. प्रायोगिक तत्त्वावर दोन वर्षांपूर्वी नायर रुग्णालयात याची सुरुवात झाली, पण येथेही करोनाच्या काळात दाखल होणाऱ्या रुग्णांच्या नोंदीपुरताच कार्यरत आहे. त्यामुळे रुग्णांना दिले जाणारे उपचार, मृतांची संपूर्ण माहिती यासाठी अजूनही कागदपत्रांवर अवलंबून असल्याचे नायर रुग्णालयातील डॉक्टरांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 15, 2020 3:19 am

Web Title: delay in receiving information of corona patient mortality zws 70
Next Stories
1 कनिष्ठ न्यायालयांचे कामकाज सुरू; उच्च न्यायालयाचे कधी?
2 निवृत्त बँक अधिकाऱ्याच्या पत्नीला एक लाखाचा गंडा
3 १०० वर्षांचे आजोबा करोनामुक्त
Just Now!
X