नायर रुग्णालयात लवकरच प्रक्रिया; स्कॅनिंगच्या माध्यमातून शरीराच्या अंतर्भागांची तपासणी

रुग्णाचा मृत्यू झाल्यावर शवविच्छेदन अहवालासाठी तासन्तास खोळंबलेले नातेवाईक आणि शरीराच्या केल्या जाणाऱ्या चिरफाडीबद्दल असलेली अढी यातून मार्ग काढण्यासाठी महानगरपालिकेच्या रुग्णालयात आता तांत्रिक शवविच्छेदनाची पद्धत अवलंबण्यात येणार आहे. एमआरआय आणि सीटी स्कॅन यंत्रांच्या मदतीने शरीरातील जखमांची पाहणी करून अहवाल तयार करण्यात येईल. पालिकेच्या नायर रुग्णालयात याची सुरुवात होत असून त्यानंतर केईएम, शीव, कूपर अशा इतर रुग्णालयांमध्येही ‘व्हच्र्युअल’ शवविच्छेदन सुरू होऊ शकेल.

रुग्णाच्या मृत्यूचे नेमके कारण समजून घेण्यासाठी शवविच्छेदन केले जाते. गुन्ह्य़ांशी संबंधित प्रकरणांमध्ये शवविच्छेदन केले जाते तसेच दीर्घ आजाराने किंवा उपचारांदरम्यान झालेल्या मृत्यूनंतरही शवविच्छेदन होते. मात्र ते करताना शरीराला दिले जाणारे छेद, रक्तस्राव याबाबत संबंधित कुटुंबीयांच्या मनात नाराजी असते. त्यामुळे यंत्रांच्या साहाय्याने शरीराचे स्कॅनिंग करून कोणतीही चिरफाड न करता बाह्य़ व अंतर्भागातील जखमा पाहता येतील. यामुळे मृत्यूच्या कारणांची अधिक विस्तृत व काटेकोर मीमांसा होऊ शकेल त्याचप्रमाणे परंपरागत शवविच्छेदनासाठी लागणारा तासन्तासाचा वेळही कमी होईल. या प्रकारच्या शवविच्छेदनासाठी साधारण ३० ते ४५ मिनिटे लागतील व त्यामुळे तज्ज्ञांवरील मानसिक व शारीरिक भारही हलका होण्यात मदत होईल.

दिल्लीत एम्समध्ये दोन वर्षांपूर्वी ‘व्हच्र्युअल’ शवविच्छेदन सुरू झाले आहे. त्यापूर्वी शीव रुग्णालयात अशा प्रकारे ‘व्हच्र्युअल’ शवविच्छेदन करण्याचा विचार सुरू झाला होता, मात्र तो नंतर बारगळला. आता नायर रुग्णालयात सध्याच्या शवागाराजवळ अशा प्रकारचे केंद्र सुरू करण्यासाठी नुकतीच वैद्यकीय व प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीतील चर्चेनुसार १५ सप्टेंबपर्यंत वेगवेगळ्या रुग्णांनुसार  व्हच्र्युअल शवविच्छेदनाचे फायदे-तोटे याबद्दल माहिती गोळा केली जाणार आहे.

आपत्कालीन घटनांच्या वेळी उपयोग

खून, संशयास्पद मृत्यू अशा प्रकारांमध्ये व्हच्र्युअल शवविच्छेदन करता येणार नाही. त्यासाठी निश्चित केलेले निकष पाळावे लागतात. मात्र कायदेशीर संदर्भ नसलेल्या प्रकरणांमध्ये याचा वापर करता येईल.एल्फिन्स्टनसारख्या मृतांची संख्या अधिक असलेल्या आपत्कालीन घटनांवेळीही या तंत्राचा वापर होईल, असे पालिकेच्या प्रमुख रुग्णालयांचे संचालक डॉ. अविनाश सुपे यांनी सांगितले. मलेशिया, नॉर्वे या देशांमध्ये अशा प्रकारे  शवविच्छेदन सुरू झाले आहे. याबाबत राज्य सरकारकडून परवानगी घेतली जाईल, असेही ते म्हणाले.

मृत्यूनंतर शवविच्छेदनासाठी लागणारा वेळ व परंपरागत पद्धतीत शरीरावर होणाऱ्या जखमा टाळणारी ही आधुनिक पद्धत आहे. या संदर्भात सर्व कागदोपत्री तयारी पूर्ण करून १५ सप्टेंबपर्यंत निविदा काढण्याचा निर्णय झाला आहे.

– रईस शेख, गटनेता, समाजवादी पक्ष