राज्य पोलीस तक्रार प्राधिकरणाच्या सदस्यपदी राजकु मार ढाकणे यांच्या नियुक्तीचा आढावा घ्यावा, ती रद्द करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली.

गेल्या महिन्यात गृह विभागाने ढाकणे यांची नियुक्ती प्राधिकरणाच्या सदस्यपदी (नागरी समाजातील मान्यवर व्यक्ती ) केली. या नियुक्तीबाबत ‘लोकसत्ता’ने मंगळवारी वृत्त प्रसिद्ध केले. या पदासाठी गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात गृह विभागाने जाहिरात देऊन इच्छुकांचे अर्ज मागविले होते. ठरलेल्या मुदतीत १३ अर्ज प्राधिकरणाला प्राप्त झाले. मुदतीनंतर एक अर्ज प्राप्त झाला. हे १४ अर्ज प्राधिकरणाने गृह विभागाकडे पाठवले. मात्र त्यात ढाकणे यांचा अर्ज नव्हता. गृह विभागाने ही नियुक्ती स्वत:च्या अधिकारकक्षेत किंवा अधिकार वापरून केली, असा दावा अवर सचिवाने केला. या वृत्ताचा दाखला देत फडणवीस यांनी मंगळवारी ठाकरे यांना पत्र लिहिले. ढाकणे यांच्याविरोधात पुण्यात दोन गुन्हे नोंद आहेत. ही वस्तुस्थिती खुद्द ढाकणे यांनीही ‘लोकसत्ता’शी बोलताना कबूल केली होती. नियुक्ती करण्यापूर्वी ही बाब माहीत नव्हती, असा दावा गृह विभागाच्या अवर सचिवाने केला.

या नियुक्तीबाबत राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मात्र मौन बाळगले. ‘लोकसत्ता’ने देशमुख यांच्याशी संपर्क साधला. मात्र देशमुख बैठकांमध्ये व्यस्त असल्याची सबब त्यांच्या खासगी सचिवांनी पुढे केली.