भाडेवाढीची मागणी करणाऱ्या मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने चालकांचे उत्पन्न बुडणार असल्याने खटुआ समितीतील प्रवासी सवलतींना विरोध केला आहे. तर मुंबई ग्राहक पंचायतीनेही भाडेवाढीची गरज नसून भाडेवाढ केल्यास प्रवासी सवलतीही लागू करण्याची भूमिका घेतली आहे. टॅक्सी संघटना आणि ग्राहक पंचायतीने परिवहन विभागाला निवेदन सादर केले असून याबाबत लवकरच बैठक होणार आहे.

गेल्या तीन वर्षांत भाडेवाढ न मिळाल्याने टॅक्सीचे किमान भाडे २२ रुपयांवरून २५ रुपये करावे, अशी मागणी मुंबई टॅक्सीमेन्स युनियनने परिवहन विभागाकडे केली आहे. यासंदर्भात गेल्या शुक्रवारी प्रधान सचिव (परिवहन) आशीष सिंह, परिवहन आयुक्त शेखर चन्ने, मुंबई टॅक्सी संघटना व मुंबई ग्राहक पंचायत यांच्यात बैठक झाली होती. त्या वेळी भाडेवाढ करावी पण प्रवासी सवलत लागू करू नये, अशी मागणी टॅक्सी संघटनेने केली. तर भाडेवाढ केल्यास प्रवास सवलती लागू कराव्यात, असे ग्राहक पंचायतीने स्पष्ट केले होते. यासंदर्भात परिवहन विभागाने सोमवारी लेखी निवेदन देण्यास सांगितले होते. त्यानुसार दोन्ही बाजूंनी निवेदन देण्यात आले. त्यानुसार टॅक्सी संघटनेने प्रवासी सवलतींना विरोध दर्शविला आहे.

मुंबई टॅक्सीमेन्स युनियनचे सरचिटणीस ए. एल. क्वाड्रोस यांनी २५ रुपये भाडेदर निश्चित करावा, अशी मागणी निवेदनाद्वारे केल्याचे सांगितले. परंतु खटुआ समितीच्या शिफारसीनुसार पुढील आठ किलोमीटरच्या प्रवासात १५ ते २० टक्के प्रवास सवलत आणि दुपारी १२ ते दुपारी ४ या वेळेत १५ टक्के प्रवास सवलत लागू करू नये, अशीही मागणी केल्याचे ते म्हणाले. त्यामुळे टॅक्सी चालकांचे नुकसान होईल व उत्पन्न मिळणार नाही. त्यामुळेच त्याला विरोध असल्याचे क्वाड्रोस यांनी स्पष्ट केले.

सवलती आवश्यक : शिरीष देशपांडे

मुंबई ग्राहक पंचायतीचे अध्यक्ष शिरीष देशपांडे यांनी मात्र सध्या भाडेवाढीची गरज नसल्याचे स्पष्ट केले. भाडे वाढल्यास ओला, उबर सेवांचा फायदा होईल. सध्या या सेवेवर सरकारचे नियंत्रण नाही. प्रथम त्याचा विचार होणे गरजेचे आहे. तसेच बेस्ट भाडेकपातीचा विचार करीत असून त्यामुळे टॅक्सी सेवेलाही त्याचा फटका बसेल. ही सर्वसामान्याची सेवा असून त्याबाबत सर्वसमावेशक विचार करण्याची मागणी केल्याचे देशपांडे यांनी सांगितले. भाडेवाढ केल्यास प्रवास सवलतही लागू करावी, अशीही मागणी केल्याचे ते म्हणाले.