वर्षअखेपर्यंत ८० हजारांहून अधिक भाडेकरारांची नोंदणी; सप्टेंबर ते डिसेंबर कालावधीत भाडेकरारांच्या संख्येत लक्षणीय भर

मुंबई : मुंबई : मुद्रांक शुल्कात केलेल्या कपातीमुळे मुंबईतील घरांच्या विक्रीत विक्रमी वाढ नोंदली गेलेली असताना भाडेकरारावर घर घेणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. गेल्या वर्षांतील सप्टेंबर ते डिसेंबर महिन्यांशी तुलना केल्यास ही वाढ ३० टक्के अधिक असल्याचे दिसून येत आहे. यंदा डिसेंबरअखेपर्यंत ८० हजारांहून अधिक भाडेकरार नोंदवले गेले आहेत.

मुद्रांक शुल्कातील कपातीचा घरखरेदीदारांनी चांगलाच फायदा उठविला. त्यातच ३१ डिसेंबरपूर्वी मुद्रांक शुल्क अदा करून पुढील चार महिन्यांत नोंदणी करण्याची मुभा दिल्याने मुद्रांक शुल्कापोटी शासनाला भरपूर महसूल मिळाला. त्याच वेळी महसुलाच्या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाडय़ाच्या घरांच्या करार नोंदणीतही यंदा लक्षणीय वाढ दिसून आली.

मुंबईत यंदा डिसेंबरअखेरीस २२ हजार ४०० इतके भाडय़ाच्या घरांचे करार नोंदले गेले आहेत. प्रत्यक्ष नोंदणी झालेल्या करारांमध्येही वाढ दिसून आली आहे. ई-नोंदणीमुळे घरबसल्या भाडेकराराची नोंदणी होते. गेल्या डिसेंबर महिन्यात फक्त १५ हजार ५७२ भाडेकरार नोंदले गेले होते.

करोना काळातही ई-नोंदणीमुळे भाडेकरारांची नोंदणी होत होती. परंतु एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट महिन्यांच्या तुलनेत सप्टेंबर ते डिसेंबपर्यंत भाडेकरारांची चांगलीच नोंदणी झाली. आतापर्यंत ८० हजार ४२७ भाडे करारांची नोंद झाली असून ती गेल्या वर्षी ६० हजार २७ इतकी होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत साधारणत: ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत वाढ झाल्याचे दिसून येत आहे. राज्यातही तशीच परिस्थिती आढळून आली आहे. राज्यात आतापर्यंत ७४ हजार ४६२ भाडेकरारांची नोंद झाली असून ती गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात ५१ हजार ७४० इतकी होती.

करोना काळात अनेक जण भाडे परवडत नसल्यामुळे मुंबईबाहेर निघून गेले. अनेकांची भाडीही थकली होती. आता हळूहळू मुंबई पूर्वपदावर यायला लागल्यानंतर हे सर्वजण परत आले आहेत. मात्र त्याच वेळी भाडेकरू मिळत नसल्यामुळे अनेकांची पंचाईत झाली होती. त्यामुळे १० ते २० टक्के कमी दराने भाडे तत्त्वावर घरे उपलब्ध असल्यामुळे अनेक जण पुढे आले आहेत. त्याचा परिणाम भाडय़ाच्या घरांच्या करारात वाढ होण्यामध्ये झाला आहे.

टाळेबंदीच्या काळातील भाडय़ाबाबतही राज्य शासनाने सवलत देऊ  केली होती. परंतु घरमालक ऐकायला तयार नव्हते. त्यांना संपूर्ण भाडे हवे होते. त्यामुळे भाडे परवडत नाही म्हणून अनेकांनी कराराचा भंग केला. मात्र टाळेबंदीत शिथिलता आल्यानंतर भाडय़ाच्या मालमत्तांना पुन्हा उठाव येऊ  लागला. मात्र पूर्वीप्रमाणे भाडे देण्यास नकार देण्यात आला. मालमत्ता रिकामी राहण्यापेक्षा ती कमी दराने का होईन पण उपलब्ध करून देण्यात या घरमालकांनी धन्यता मानली. त्यामुळेच भाडेकराराच्या नोंदणीत वाढ झाल्याचे एका एजंटने सांगितले. चित्रपट तसेच मालिकांच्या चित्रीकरणाला परवानगी मिळाल्यानंतर भाडेकरारांमध्ये अधिक वाढ झाल्याचे निरीक्षणही या घडामोडींशी संबंधित सूत्रांनी नोंदविले. येत्या काही महिन्यात त्यात आणखी वाढ होईल, अशी शक्यता त्याने वर्तविली.