17 December 2017

News Flash

शिवाजी पार्कवर शिवसेनाप्रमुखांचे स्मारक उभारण्याची मागणी

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्कवर रविवारी पार पडल्यावर लगेच तेथे त्यांचे स्मारक

विशेष प्रतिनिधी, मुंबई | Updated: November 20, 2012 5:11 AM

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अंत्यसंस्कार शिवाजी पार्कवर रविवारी पार पडल्यावर लगेच तेथे त्यांचे स्मारक व्हावे, अशी मागणी ज्येष्ठ शिवसेना नेते मनोहर जोशी यांनी सोमवारी केली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचा पुतळा व्हावा, असा प्रस्ताव शिवसेनेकडून राज्य सरकारकडे दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
बाळासाहेबांचे आणि शिवतीर्थाचे नाते तब्बल चार दशकांचे. शिवसेनेच्या स्थापनेची सभा तेथे झाली, दसरा मेळावे आणि अनेक सभा झाल्या. अनेक चढउतार पाहिेले. तेथेच बाळासाहेबांचे अंत्यसंस्कारही झाले. हे अतूट नाते चिरंतन रहावे, यासाठी हे स्मारक शिवाजी पार्कवरच व्हावे. त्यासाठी तीच जागा सर्वात योग्य आहे, असे जोशी यांनी ‘लोकसत्ता’ शी बोलताना स्पष्ट केले.
बाळासाहेब हे छत्रपती शिवाजी महाराजांचे भक्त होते. आयुष्यभर ते शिवशाहीसाठी स्थापनेसाठी झटले, शिवरायांची शिकवण आचरणात आणली. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांचा पुतळा उभारला जावा. त्यासाठी फार जागा लागणार नाही. सरकारने जागा निश्चित करून शिवसेनेला स्मारकासाठी परवानगी द्यावी. ते उभारण्याची जबाबदारी आम्ही पार पाडू, असे जोशी यांनी नमूद केले.   

First Published on November 20, 2012 5:11 am

Web Title: demand for to buildup of balasheb memorial on shivaji park