मुंबईतील पश्चिम रेल्वेवर असणाऱ्या मुंबई सेंट्रल रेल्वे टर्मिनसला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केली आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या जीवनातील दिर्घकाळ मुंबईत व्यतीत केला आहे. मुंबई ही आंबेडकरांची कर्मभूमी होती. तसेच याठिकाणी त्यांच्या अनेक आठवणीही असलव्याने आम्ही ही मागणी करत असल्याचे ते म्हणाले. केल्याने त्यांच्या कार्याची दखल म्हणून हे नामकरण करण्यात यावे असे आठवले म्हणाले. यासंदर्भात आपण रेल्वेमंत्री पियुष गोयल आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मागील १० वर्षांपासून सातत्याने ही मागणी करण्यात येत असून आता त्याचा पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडून जून २०१७ मध्ये अधिसूचना काढल्यानंतर छत्रपती शिवाजी टर्मिनसच्या नावात ‘महाराज’ शब्दाचा समावेश करण्यात आला. तसेच जुलै महिन्यात पश्चिम रेल्वे स्थानक असलेल्या एल्फिन्स्टन स्थानकाचे नाव बदलून प्रभादेवी करण्यात आले होते. छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव सीएसटी म्हणजेच व्हीटी स्थानकाला देण्यात यावे यासाठी लोकप्रतिनिधींकडून मागणी करण्यात येत होती. अखेर ती मागणी पूर्ण करण्यात आली आहे. याबरोबरच मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळालाही शिवाजी महाराजांचे नाव दिल्याने आम्हाला आनंद वाटत असल्याची भावना आठवले यांनी व्यक्त केली. आता आठवले यांच्या या मागणीचा रेल्वेमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून विचार केला जाणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.