पालिकेने गेल्या आठवडय़ात देवनार कचराभूमीला खेटून उभ्या असलेल्या अनधिकृत झोपडय़ांविरुद्ध केलेल्या धडक  कारवाईला झोपडपट्टीवासीयांनी विरोध करण्यास सुरुवात केली असून राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटनांकडून झोपडपट्टीवासीयांना बळ मिळाल्यामुळे मंगळवारी ही कारवाई थंडावली. त्यामुळे हा सुमारे पाच एकराचा भूखंड अनधिकृत झोपडपट्टय़ांच्या विळख्यातून कसा सोडवायचा असा प्रश्न पालिका अधिकाऱ्यांना पडला आहे.

देवनार कचराभूमीतील कचऱ्याला आग लागल्यानंतर संरक्षण भिंतीला खेटून उभ्या राहिलेल्या अनधिकृत झोपडय़ा तोडून भूखंड मोकळा करण्याचा निर्णय पालिकेने घेतला होता. या भूखंडावर मनोरंजन मैदान उभारण्याचा पालिकेचा मानस आहे. गेल्या आठवडय़ापासून पालिकेने या झोपडय़ा जमीनदोस्त करण्यास सुरुवात केली. येथील सुमारे एक हजार झोपडय़ांपैकी आतापर्यंत ४७६ झोपडय़ा तोडण्यात आल्या.गेल्या शनिवारी पालिका अधिकारी-कर्मचाऱ्यांवर दगडफेक करीत झोपडपट्टीवासीयांनी या कारवाईत अडथळा निर्माण केला होता. पोलीस बंदोबस्तात मंगळवारी झोपडय़ा तोडण्याची कारवाई करण्यासाठी पालिका अधिकारी-कर्मचारी देवनार कचराभूमीजवळ गेले. मात्र झोपडपट्टीवासीयांनी पालिकेच्या जेसीबीवर चढून,तसेच डम्परखाली लोळण घेत कारवाईत अडथळा केला.