कचरामाफियांनी खिंडार पाडले

कंत्राटदाराने देवनार कचराभूमीच्या सभोवताली बांधलेल्या संरक्षक भिंतीला कचरामाफियांनी ठिकठिकाणी खिंडारे पाडली असून ती पुन्हा बांधण्यासाठी कंत्राटदाराने पालिकेकडे अतिरिक्त पैशांची मागणी केली होती. मात्र पालिकेने जादा पैसे देण्यास नकार दिल्याने आता ही भिंत कळीचा मुद्दा बनली आहे. संरक्षक भिंतीच्या खिडारांमधून येऊन कचरामाफिया दररोज शेकडो टन कचरा रात्रीच्या वेळी कचराभूमीत टाकत आहेत. गंभीर बाब म्हणजे या कचऱ्यावर कोणतीच प्रक्रिया केली जात नाही.

कचराभूमी शास्त्रोक्त पद्धतीने बंद करायची आहे. त्यासाठी सभोवताली संरक्षक भिंत बांधण्याचे काम कंत्राटदाराला देण्यात आले होते. त्यानुसार कंत्राटदाराने संरक्षक भिंत उभी केली. मात्र येथे कार्यरत असलेल्या कचरामाफियांनी या भिंतीला अनेक ठिकाणी खिंडार पाडले. कचरामाफिया रात्रीच्या वेळी गाडय़ा भरभरून कचरा घेऊन येतात आणि खिंडारांमधून कचराभूमीत प्रवेश करतात. मिळेल तेथे कचरा टाकून गाडय़ा माघारी फिरतात. या गाडय़ा रोखण्याची हिंमत पालिका अधिकारीच काय, पण पोलिसांमध्येही नाही, असे काही समाजसेवकांनी नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले.

कचराभूमीभोवती पुन्हा संरक्षक भिंत बांधण्याची नितांत गरज आहे. या कचराभूमीत दलदल असल्यामुळे भिंत बांधून उपयोग नाही. पूर्वीप्रमाणे भिंत बांधल्यास कचरामाफिया पुन्हा ती तोडतील. त्यामुळे दलदलीमध्ये खोलवर बांधकाम करून भिंत उभारण्यासाठी पालिकेने अधिक पैसे द्यावे, अशी मागणी कंत्राटदाराने पालिका अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र पालिका अधिकाऱ्यांनी ही मागणी धुडकावून लावली. इतकेच नव्हे तर पूर्वी बांधलेल्या भिंतीचे पैसेही कंत्राटदाराला देण्यास नकार देण्यात आला. पालिका अधिकाऱ्यांच्या या भूमिकेमुळे संरक्षक भिंत कळीचा मुद्दा बनली आहे.

माफियांचे सीसी टीव्ही कॅमेरे

देवनार कचराभूमीची पाहणी करण्यासाठी पालिका अधिकारी अनेक वेळा येतात. मात्र पालिका अधिकारी कचराभूमीत आल्याचे समजताच कचरा माफियांची माणसे तेथे पोहोचतात आणि अधिकाऱ्यांना धमकावून तेथून पळवून लावतात. कचरा माफियांनी येथे सीसी टीव्ही कॅमेरे बसविल्याचा दावा पालिका अधिकाऱ्यांकडून करण्यात येत आहे. पालिकेने कचराभूमीत बसविलेले सीसी टीव्ही कॅमेरे कंत्राटाची मुदत संपताच कंत्राटदाराने काढून नेले. आता कचराभूमीची सुरक्षा वाऱ्यावरच आहे. पण तेथे माफियांचे कॅमेरे मात्र कायम आहेत, याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

कांजूर, मुलुंड कचराभूमीवर भार

देवनार कचराभूमीत टाकण्यात येणारा कचरा आता कांजूर आणि मुलुंड येथील कचराभूमीत टाकण्यात येत आहे. पश्चिम उपनगरातूनही या ठिकाणी कचरा येतो. त्या विषयी या परिसरातील रहिवाशांकडून तीव्र नापसंती व्यक्त करण्यात येत आहे. या दोन्ही कचराभूमी लवकरात लवकर बंद कराव्यात अशी मागणी रहिवाशांकडून करण्यात येत आहे. आता तर शहराचा कचराही या दोन्ही कचराभूमीमध्ये टाकण्यात येत असल्यामुळे आसपासच्या परिसरात दरुगधीचा प्रश्न अधीकच जटील झाला आहे. त्यामुळे येथील रहिवाशी संतप्त झाले आहेत.