राज्यात अभिव्यक्तिस्वातंत्र्याची गळचेपी होत असून पोलीस बळ आणि धमक्या देऊन आवाज दाबला जाणार असेल, तर भाजपचीही दोन हात करण्याची तयारी आहे, असे आव्हान विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला दिले. माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जे जमले नाही, ते तुम्हाला काय जमणार, असा सवाल केला. एक वर्ष होण्याआधीच सत्तेची धुंदी डोक्यात गेली असून आम्ही ती उतरवू, सरकारचे पतन अटळ आहे. कोणतीही भेसळ न करता भाजपचा भगवा मुंबई महापालिकेवर फडकवून दाखवू, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.

मुंबई भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत बोलताना फडणवीस यांनी करोनाकाळात राज्य सरकारने करोडो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप करून त्याची लक्तरे वेशीवर टांगून सरकारचा खरा चेहरा उघड करण्याचा इशारा दिला. गेल्या निवडणुकीतच भाजपला सत्ता मिळणार होती, पण मैत्री टिकविण्यासाठी ती देऊन टाकली,  आता मुंबई महापालिकेतील भ्रष्टाचारी सत्ता उलथून टाकून भाजपची सत्ता आणली जाईल, असा आत्मविश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. हिंदुत्व केवळ वक्तव्यांमधून नाही तर कृतीतून दाखवावे लागते, असा टोलाही त्यांनी शिवसेनेला लगावला आणि जम्मू व काश्मीरमधील गुपकार आघाडीत सामील झालेल्या काँग्रेसला सवाल विचारावेत, अशी टिप्पणी केली.

पत्रकार अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, अनेक पत्रकारांनी माझ्यावर टीका केली. समाजमाध्यमांमधूनही माझ्या कुटुंबीयांवर वाईट भाषेत लिहिले गेले. पण मी मुख्यमंत्रिपदी असताना कोणालाही तुरुंगात टाकले नाही. अभिव्यक्तिस्वातंत्र्य, सहिष्णूतेचे धडे देणारे विचारवंत आता मात्र शांत आहेत. भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांना राजकीय प्रत्युत्तर देण्याऐवजी धमक्या दिल्या जात आहेत. हे आम्ही सहन करणार नाही व दोन हात करून संघर्ष करण्याची आमचीही तयारी आहे.

सत्तेत सहभागी असलेल्या पक्षाच्या काही नेत्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना मंगळवारी आदरांजली वाहिली नाही. शिवसेनेशी आमचे मतभेद व कितीही भांडणे झाली, तरी बाळासाहेब ठाकरे व त्यांचे विचार कायमच पूजनीय आहेत, असे फडणवीस यांनी सांगितले.

अहंकारातून प्रकल्पाला विरोध

मुंबईतील २० वर्षे रखडलेले प्रकल्प भाजप सरकारने मार्गी लावले. शिवसेनेने मेट्रो प्रकल्पाला आणि बुलेट ट्रेनला केवळ अहंकारातून विरोध केला. त्यामुळेच ज्येष्ठ अधिकाऱ्यांच्या समितीचा अहवाल डावलून कांजूरमार्गला कारशेडचा निर्णय घेतला. त्यामुळे विलंब व खर्चवाढ होऊन प्रकल्प आर्थिकदृष्टय़ा अव्यवहार्य होऊन मुंबईकरांवर बोजा येईल, असा इशारा फडणवीस यांनी दिला. मुंबई विमानतळ झोपडपट्टीवासीयांचे त्याच परिसरात पुनर्वसन, २०११ पर्यंतच्या झोपडय़ांना संरक्षण, धारावी प्रकल्पाला रेल्वेची जमीन, बीडीडी चाळींचा प्रश्न  भाजप सरकारनेच  मार्गी लावल्याचे फडणवीस यांनी सांगितले.

‘अनुच्छेद ३७० पुन्हा येणे अशक्य’

आता काहीही झाले, तरी अनुच्छेद ३७०वे पुन्हा लागू होणार नाही आणि कोणीही तशी हिंमतही करू नये, असे प्रतिपादन विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी येथे केले.  जम्मू व काश्मीरचे माजी मुख्य मंत्री फारूक अब्दुल्ला यांनी याबाबतचे वक्तव्य केले आहे, याचा उल्लेख करून फडणवीस म्हणाले, अनेक राजकीय पक्षांचा समावेश असलेल्या गुपकर आघाडीमध्ये काँग्रेस सामील झाला आहे, पण फारूक अब्दुल्ला व अन्य पक्षांच्या विघटनवाद्यांशी चर्चा करून त्यांना बरोबर घेण्याच्या ध्येयधोरणांना काँग्रेसचा पाठिंबा आहे का, हे त्यांनी जाहीर करावे असे आव्हान फडणवीस यांनी दिले आहे.