मुंब्रा रेल्वे स्थानक परिसर विकासाच्या प्रस्तावावरून शनिवारच्या स्थायी समितीच्या सभेत सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलाच कलगीतुरा रंगला. यापूर्वीच्या स्थायी समितीच्या ठरावांचे काय झाले, असे प्रश्न करून सत्ताधारी सदस्यांनी या विषयाच्या मंजुरीत अडथळे आणले. अखेर सभापतींनी हा विषय मंजूर करीत सत्ताधाऱ्यांना चपराक दिली.
या विषयाची चौकशी करावी अशी मागणी करणारे पत्र सत्ताधारी सदस्यांकडून आयुक्त व इतर पदाधिकाऱ्यांना देण्यात आले. मुंब्रा रेल्वे स्थानक परिसर विकासाचा प्रस्ताव स्थायी समितीत मंजुरीसाठी ठेवण्यात आला होता. हा एकच विषय मंजुरीसाठी का ठेवला गेला, अन्य विषयांचे काय झाले, असे प्रश्न उपस्थित करून सत्ताधाऱ्यांनी या विषयाच्या मंजुरीत अडथळे आणले. प्रशासनाने हा प्रस्ताव आपल्या स्तरावर मंजूर करावा अशी मागणी सत्ताधारी सदस्यांनी केली.
सभागृहात या विषयाच्या मंजुरीवरून गोंधळाला सुरुवात होताच सत्ताधारी सदस्यांनी हा विषय मतदान घेऊन मंजूर करा असे सांगून विरोधी पक्षाच्या सदस्यांना अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला. विरोधी बाकावरील काही सदस्य गैरहजर होते. भोजनानंतर हा विषय मंजूर करीत असल्याचे सभापतींनी जाहीर केले. यावेळी सत्ताधारी नगरसेवकांनी या मंजुरीला विरोध दर्शवून सभापतींच्या या निर्णयाचा निषेध केला.