श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती पुरस्कार वितरणप्रसंगी मुख्यमंत्र्यांचे प्रतिपादन

नागपूर येथील श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती विद्यालयाचा मी माजी विद्यार्थी असून मला घडविण्यात आणि माझ्यावर चांगले संस्कार करण्यात या शाळेचे महत्वाचे योगदान आहे. सुसंस्कारित माणूस घडविण्यात पुस्तकी शिक्षणाबरोबरच संस्कार आणि मूल्याधारित शिक्षणही महत्वाचे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी मुंबईत माटुंगा येथे केले.

Milind narvekar to join bjp?
पुढील लक्ष्य मिलिंद नार्वेकर! ठाकरे गटाला चितपट करण्यासाठी देवेंद्र फडणवीसांकडून खास रणनीती?
lok sabha election 2024 dcm devendra fadnavis slams uddhav thackeray in daryapur rally
सत्ता गेल्याने उद्धव ठाकरे भ्रमिष्ट! उपमुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीसांची टीका
MNS-BJP Alliance
मनसे महायुतीत येणार का? पाडवा मेळाव्याआधी देवेंद्र फडणवीसांचे सूचक विधान; म्हणाले, “राज ठाकरे हे पहिले व्यक्ती…”
Former District Congress President Prakash Devtale joins BJP
जिल्हा काँग्रेसचे माजी अध्यक्ष प्रकाश देवतळे यांचा भाजपमध्ये प्रवेश

साऊथ इंडियन एज्युकेशन सोसायटी (एसआयईस)तर्फे माटुंगा येथील षण्मुखानंद सभागृहात ‘श्री चंद्रशेखरेंद्र सरस्वती राष्ट्रीय’ पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्यात ‘सार्वजनिक नेतृत्वा’साठीचा पुरस्कार मुख्यमंत्री फडणवीस यांना प्रदान करण्यात आला. त्यानंतर आपले मनोगत व्यक्त करताना ते बोलत होते.

मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासह ‘विज्ञान-तंत्रज्ञान’ क्षेत्रासाठीचा पुरस्कार भारतीय अंतराळ संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. किरणकुमार, ‘प्रवचन कथा’साठीचा पुरस्कार कमला मूर्ती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतीय संस्कृतीचा प्रसार करण्यासाठी देण्यात येणारा पुरस्कार डॉ. जॉन मार (मार हे इंग्लंडमध्ये गेली ३५ वर्षे कर्नाटकी संगीत शिकविण्याचे काम करत आहेत) यांना प्रदान करण्यात आला. डॉ. जॉन यांच्या अनुपस्थितीत हा पुरस्कार त्यांचा मुलगा जेम्स यांनी स्वीकारला. प्रत्येकी अडीच लाख रुपये, सन्मानपत्र आणि समई असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. ‘एसआयईस’ संस्थेचे अध्यक्ष डॉ. व्ही. शंकर यांच्या हस्ते हे तीनही पुरस्कार प्रदान करण्यात आले.

सत्ता हे साध्य नाही तर साधन आहे, या विचारातून मी घडत गेल्याचे सांगून मुख्यमंत्री म्हणाले, पुरस्कार मिळाला की जबाबदारीही वाढते. माझ्यापेक्षा वयाने आणि अनुभवाने मोठय़ा असलेल्या मान्यवरांसोबत माझी या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली ही बाब माझ्यासाठी आनंदाची व अभिमानाची आहे.

पुरस्काराची मिळालेली सर्व रक्कम आपण राज्य शासनाच्या ‘जलयुक्त शिवार’ या योजनेसाठी देत असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी या वेळी केली.

डॉ. किरणकुमार यांनी सांगितले, हा पुरस्कार माझा एकटय़ाचा नाही तर तो माझे सर्व सहकारी आणि संस्थेचा  आहे. डॉ. विक्रम साराभाई यांनी भारतीय अंतराळ संशोधनाचा पाया रचला. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत संस्था पुढे जात असून हा पुरस्कार म्हणजे आम्ही जे काम करत आहोत त्याला मिळालेली पावती आहे. कमला मूर्ती यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. डॉ.  जॉन मार यांच्या भाषणाची ध्वनिचित्रफीत या वेळी दाखविण्यात आली. डॉ. व्ही. शंकर यांनी प्रास्ताविक केले. या कार्यक्रमास शिक्षणमंत्री विनोद तावडे, स्थानिक आमदार समीर सेल्वन उपस्थित होते.