आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेबरोबर नक्कीच युती होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. ते एबीपी माझा वृत्तवाहिनीवरील ‘माझा महाराष्ट्र, माझं व्हिजन’ या कार्यक्रमात बोलत होते. दोन्ही निवडणुकीसाठी युती झाली पाहिजे असे ते म्हणाले. शिवसेनेबरोबर २५ वर्षांपासूनची युती तुटली त्याला आम्ही जबाबदार नाही असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

२०१४ साली आम्ही शिवसेनेला १४७ जागा सोडणार होतो आणि आम्ही १२७ जागांवर निवडणूक लढवणार होतो. पण शिवसेना १५१ जागांवर अडून बसली होती. आम्ही चार दिवस चर्चा केली. त्यावेळी युती झाली असती तर शिवसेनेला १२० च्या आसपास आणि आम्हाला १०५ जागा मिळाल्या असत्या. पण शिवसेनेला हा प्रस्ताव मान्य नव्हता. महाराष्ट्राच मुख्यमंत्रीपद माझ्या नशिबी होतं म्हणून त्यांनी हा प्रस्ताव मान्य केला नाही असे फडणवीस म्हणाले.

शिवसेना महाराष्ट्रातील मोठा पक्ष होता. पण २०१४ साली आम्ही त्यांच्यापेक्षा मोठे झालो. हीच गोष्ट त्यांच्या अगवळणी पडायला वेळ लागतोय असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. शिवसेना आणि भाजपाची २५ वर्ष  युती होती. राजकीय वस्तुस्थिती पाहता दोन्ही पक्षांची युती झाली पाहिजे असे फडणवीस म्हणाले. मुलायम सिंह यादव आणि मायावती कट्टर विरोधक एकत्र येतात मग शिवसेना-भाजपा युती का होणार नाही ? असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. हे सरकार युतीच नसून फक्त भाजपाच आहे असे शिवसेना नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते म्हणाले. त्यावर फडणवीस यांनी तो शिवसेनेच्या राजकीय रणनितीचा भाग आहे असे उत्तर दिले. मंत्रिमंडळात शिवसेनेसोबत मिळून एकमताने आम्ही निर्णय घेतो. काही मुद्यांवर मतभेद असल्यास संवादाने प्रश्न सोडवतो असे फडणवीस म्हणाले.