मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात दुसऱ्या क्रमांकाच्या स्थानावर राहिलेले एकनाथ खडसे गेल्या दीड वर्षांत वादग्रस्त विधानांमुळे कायमच चर्चेत राहिले आहेत.
ज्येष्ठता असूनही मुख्यमंत्रिपदावरचा हक्क डावलला गेल्यावर खडसे यांनी अनेकदा जाहीरपणे नाराजी व्यक्त केली
होती.
हेमामालिनी यांना भाडेपट्टय़ाने दिलेल्या जमीन प्रकरणावरून बरीच उलटसुलट चर्चा झाली. मराठवाडय़ातील दौऱ्यात हेलिकॉप्टर वापरल्याने हेलिपॅडसाठी बऱ्याच पाण्याचा अपव्यय झाला. त्यावरून खडसे यांच्यावर टीका झाली, तरी त्यांनी विरोधकांना प्रत्युत्तर देत जलदगतीने निर्णय घेण्यासाठी हे आवश्यकच असल्याचे स्पष्ट केले होते. मुख्यमंत्री फडणवीस यांनी मात्र नंतरच्या काळात दुष्काळग्रस्त भागाच्या दौऱ्यात हेलिकॉप्टरऐवजी गाडीचा वापर केला होता.
विरोधी पक्षनेते असताना खडसे हे तडजोडी करतात, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांनी केला होता. भाजपने विधानसभा निवडणुकीआधी शिवसेनेशी युती तोडण्याचा निर्णय घेतला, त्याची घोषणा ज्येष्ठ नेत्याच्या भूमिकेतून खडसे यांनीच केली होती. त्यानंतरच्या काळात शिवसेनेच्या टीकेला आक्रमकपणे प्रत्युत्तर खडसे यांनीच दिले. त्यामुळे ते शिवसेनेच्या टीकेचे कायमच लक्ष्य ठरले होते.
विरोधकांच्या टीकेला चोख व आक्रमकपणे प्रत्युत्तर देणारे खडसे हे गेल्या दीड वर्षांतही आपल्या वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत राहिले.

* ‘मुख्यमंत्री बहुजन समाजाचा हवा होता’ या त्यांच्या वक्तव्यावरून उलटसुलट चर्चा झाली होती.
* शेतकऱ्यांना मोबाइलची बिले भरता येतात, पण विजेची का भरत नाहीत, या त्यांच्या विधानावरूनही बराच वाद झाला होता.