महाराष्ट्र हे देशाचे ऊर्जा केंद्र (पॉवर हाऊस) असून जगभरातील गुंतवणूकदारांचे पसंतीचे राज्य आहे. देशातील सर्वाधिक स्टार्टअप महाराष्ट्रात सुरू झाल्याने महाराष्ट्र हे स्टार्टअपची राजधानी म्हणून ओळखले जात आहे. महाराष्ट्रात मोठय़ा गुंतवणुकीची संधी उपलब्ध आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी इंडो-फ्रेंच चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीच्या ४१व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत केले.
वांद्रे-कुर्ला संकुलातील हॉटेल सोफीटेल येथे आयोजित या सभेत फ्रान्सचे भारतातील राजदूत अॅलेक्झांडर जिग्लर पाहुणे म्हणून उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. इंडो-फ्रान्स चेंबर ऑफ कॉमर्स ही अतिशय महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेसह राज्यात उद्योगाच्या वाढीसाठी सहकार्य करण्यास राज्य सरकार तयार आहे. देशाच्या औद्योगिक उत्पादनात २५ टक्के वाटा एकटय़ा महाराष्ट्राचा आहे.
गेल्या चार वर्षांत उद्योगवाढीसाठी ईज ऑफ डुइंग बिझनेस, डिजिटल प्लॅटफॉर्म, एक खिडकी योजना आदी विविध उपाययोजनांमुळे राज्य हे जागतिक गुंतवणूकदारांचे सर्वाधिक पसंतीचे राज्य ठरले आहे. गेल्या वर्षी देशातील एकूण परदेशी गुंतवणुकीपैकी ४० टक्क्यांपेक्षा जास्त गुंतवणूक महाराष्ट्रात झाली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 23, 2018 12:50 am