मुख्यमंत्र्यांचा निर्णय; उर्वरित रक्कम बँक खात्यात जमा करण्याचे आदेश

पूरग्रस्त कुटुंबांना प्रतिकुटुंब पाच हजार रुपयांची रोख मदत तातडीने करावी आणि उर्वरित रक्कम बॅंक खात्यात जमा करावी, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी प्रशासनाला दिला. पूरग्रस्त भागांची लवकरात लवकर स्वच्छता करण्यासाठी मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या सर्व महानगरपालिकांमधून काही सफाई कर्मचारी व साधनसामग्री कोल्हापूर-सांगली-साताऱ्यातील पूरग्रस्त भागात पाठवण्याचा आदेशही फडणवीस यांनी दिला.

मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कक्षाला भेट देऊन मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील ठिकठिकाणच्या पूरपरिस्थितीचा आढावा घेतला. मुख्य सचिव अजोय मेहता यांच्यासह संबंधित अधिकारी यावेळी उपस्थित होते. पूरपरिस्थितीत ठिकठिकाणी अडकलेल्या ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले असून, या नागरिकांसाठी ३७२ तात्पुरती निवारा केंद्रे सुरू करण्यात आली. राष्ट्रीय व राज्य आपत्ती व्यवस्थापन दलाच्या ३२ पथकांसह लष्कर, नौदल, तटरक्षक दलाची एकूण १०५ बचाव पथके कार्यरत आहेत.

कोल्हापूर जिल्ह्यात ५४ तर सांगली जिल्ह्यात ५१ पथकांचा समावेश आहे. शिवाय पुणे, मुंबई, ठाणे, पालघर, सिंधुदुर्ग, नाशिक, धुळे, नागपूर येथेही बचाव पथके कार्यरत आहेत.

राज्यातील १० जिल्ह्यांमधील ४ लाख ४८ हजार नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आले आहे. त्यात कोल्हापूर जिल्ह्यातील २ लाख ४५ हजार तर सांगली जिल्ह्यातील १ लाख ५९ हजार नागरिकांचा समावेश आहे. त्यासाठी २२६ बोटींचा वापर करण्यात येत आहे.

कोल्हापूर, सांगलीसह सातारा, ठाणे, नाशिक, पालघर, रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांमध्ये ७० तालुके बाधित झाले आहेत. बाधित गावांची संख्या ७६१ आहे.

अमित शहा यांच्याकडून हवाई पाहणी

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांच्यासह बेळगावातील पूरस्थितीची हवाई पाहणी केली. त्यानंतर शहा यांनी कोल्हापूर-सांगलीतील पूरस्थितीचीही हवाई पाहणी केली. खुद्द अमित शहा यांनी ट्विटरवरून याबाबतची माहिती दिली. महाराष्ट्राला पूरनियंत्रणासाठी केलेल्या मदतीबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहा यांचे आभार मानले आहेत.ह्ण

उपाययोजनांवर भर..

  • स्वच्छता मोहिमेसाठी सरकारी, निमसरकारी, खासगी स्तरावर उपलब्ध होणारी सर्व यंत्रणा राबविणार. पूरग्रस्त गावांमध्ये औषधांची फवारणी.
  • पेट्रोल, डिझेल व गॅसपुरवठा सुरळीत करण्यावर भर. खंडित वीजपुरवठा तातडीने सुरळीत करण्याचे व शिरोळ येथे तातडीने चारा पोहोचविण्याच्या मुख्यमंत्र्यांच्या सूचना.
  • महामार्गावर वारंवार पाणी साचणाऱ्या ठिकाणी उड्डाणपूल बांधण्याचे प्रस्ताव तयार करण्याचे आणि सांगलीत आपत्ती व्यवस्थापनाच्या मदतीसाठी कवलापूर येथे सुसज्ज विमानतळ तयार करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश.