३१ ऑक्टोबपर्यंत  शेतकऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत कर्जमाफी ; विकास कामांना मात्र काही प्रमाणात फटका

शेतकरी कर्जमाफीसाठी ‘हीच योग्य वेळ’ असल्याचे प्रतिपादन करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ‘आम्ही मध्यावधी निवडणुकीसाठी कधीही तयार’ असल्याचे वक्तव्य करीत विधानसभेच्या मध्यावधी निवडणुकीचे संकेत दिले. कोणत्याही परिस्थितीत ३१ ऑक्टोबपर्यंत कर्जमाफी केली जाईल, हा ‘माझा शब्द’ असल्याची ग्वाही देत फडणवीस यांनी ३० हजार कोटी रुपयांहून अधिक भार पडणार असल्याने विकास कामांवर व राज्याच्या अर्थव्यवस्थेला काही प्रमाणात फटका बसेल, अर्थसंकल्प तुटीचा राहील, असे स्पष्ट केले. आधीच्या कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या सुरूच राहिल्या, त्यामुळे त्या आता पूर्णपणे थांबतील, असे निश्चित सांगता येणार नाही. पण आता तरी त्या थांबाव्यात ही अपेक्षा आहे त्यासाठी अन्यही उपाययोजना आम्ही करीत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी ‘लोकसत्ता’ला सांगितले.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात कर्जमाफीच्या मागणीमुळे कामकाज झाले नाही आणि गेल्या दीड महिन्यात शिवसेनेसह विरोधी पक्षांनी राज्यात संघर्ष यात्रा व आंदोलने केली. तरीही ‘कर्जमाफी योग्य वेळी देण्यात येईल. आधी शेतकऱ्यांना उत्पन्न वाढवून कर्ज परतफेडीसाठी व पुन्हा कर्जबाजारी होऊ नये, यासाठी सक्षम केले जाईल आणि त्यानंतरच कर्जमाफी दिली जाईल,’ अशी भूमिका फडणवीस यांनी घेतली होती. मात्र शेतकऱ्यांचा संप सुरू झाल्यावर फडणवीस यांनी कर्जमाफीची घोषणा केली. या पाश्र्वभूमीवर ‘लोकसत्ता’शी बोलताना त्यांनी अनेक बाबींचा ऊहापोह केला. सत्तेत असूनही विरोधकांच्या भूमिकेत असलेल्या शिवसेनेच्या त्रासातून सुटका करून घेण्यासाठी मध्यावधी निवडणुकीची तयारी भाजपकडून सुरू आहे. या पाश्र्वभूमीवर ‘योग्य वेळ’ दीड महिन्यात लगेच कशी आली, मध्यावधीची ही तयारी आहे का, असे विचारता फडणवीस यांनी सूचक हास्य करीत ‘हीच योग्य वेळ’ असल्याचे स्पष्ट केले. कर्जमाफीचा निर्णय होण्याआधीही शेतकरी भाजपच्या पाठीशी होता, हे स्थानिक निवडणुकीत आधीच दिसून आले आहे. आता तर कर्जमाफी झाली असल्याने आम्ही मध्यावधीसाठी कधीही तयार आहोत, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. मात्र कर्जमाफीचा निर्णय राजकीय भूमिकेतून नाही,  असेही त्यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेमुळे भाजप आक्रमक होण्याचीच चिन्हे असून शिवसेनेला किंमत दिली जाणार नाही, अशी शक्यता आहे. सरकार कर्जमाफी करणारच नाही, अशाच भ्रमात अनेक जण होते. त्यामुळे मी हा निर्णय घेतल्यावर अनेकांना धक्काच बसला आणि पक्षश्रेष्ठींच्या सूचनेनुसार किंवा त्यांच्याशी सल्लामसलत न करता हा निर्णय घेतला असल्याचेही नमूद केले.

आत्महत्या थांबण्याची अपेक्षा

केंद्र सरकारने याआधी २००७ मध्ये सात हजार कोटी रुपयांची कर्जमाफी केली होती व त्याचा लाभ ३० लाख शेतकऱ्यांना झाला होता. शेतकऱ्यांच्या आत्महत्या त्यानंतरही सुरू राहिल्या. त्या आता थांबाव्यात, अशी अपेक्षा आहे व त्यासाठी अन्यही आवश्यक उपाययोजना सरकार करीत आहे, असे फडणवीस यांनी सांगितले. कर्जमाफीच्या निर्णयाचा आर्थिक ताण राज्याच्या तिजोरीवर येईलच व तूट वाढेल. केंद्र सरकारकडून मदत मागितली जाईल. ती मिळाली तर ठीकच आहे, अन्यथा राज्याच्या ताकदीवर आम्ही ते निभावून नेऊ, असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केला. राज्यात अराजक माजविण्याचा व जनतेच्या भावना भडकाविण्याचा प्रयत्न काही व्यक्ती करीत असल्याचा आरोप फडणवीस यांनी केला. राज्य सरकारने कर्जमाफीचा निर्णय घेऊनही संप सुरू ठेवला तर तो राजकीय हेतूंनी ठेवला आहे आणि शेतकऱ्यांच्या हिताविरोधातच आहे, असे फडणवीस यांनी स्पष्ट केले.