राज्याच्या विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवसाचे कामकाज सुरु होण्याआधी पत्रकारांशी संवाद साधताना वरळीचे आमदार आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे. राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर टीका करता फडणवीस यांनी नाईट लाइफच्या मुद्द्यावरुन ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. वरळीमधील एका पबमधील गर्दीचे व्हिडीओ रविवारी समाज माध्यमांवर व्हायरल झाल्यासंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना फडवीस यांनी, सोशल डिस्टन्सिंग वगैरे फक्त शिवजयंतीसाठी, नाईट लाईफचे तर आदेश मिळालेत असा टोला लगावला आहे.

ऱविवारी समाजमाध्यमांवर वरळीमधील क्लब आणि पबमधील काही व्हिडीओ व्हायरल झाले. यामध्ये नागरिकांची मोठ्या संख्येने गर्दी दिसून येत आहे. या व्हिडीओमध्ये करोनाचे नियम आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवल्याचे चित्र पाहायला मिळत आहेत. याचसंदर्भात फडणवीस यांना प्रश्न विचारला असता त्यांनी एकदम खोचक शैलीमध्ये या प्रश्नाचे उत्तर दिले. वरळीच्या लोकांचं म्हणणं त्यांचे आमदार आणि लोकप्रतिनिधींच पूर्णपणे ऐकतात. त्यामुळेच करोनाच्या काळामध्ये आपल्याला नाईट लाइफ पहायला मिळत आहे, असा टोला फडणवीस यांनी वरळीचे आमदार आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांचं नाव न घेता लगावला. तसेच पुढे बोलताना, “११ ची मर्यादा त्या ठिकाणी नाहीय. रात्रभर तिथे क्लब, पब तिथे सुरु आहेत. कोणतंही सोशल डिस्टन्सिंग तिथे पाळलं जात नाहीय. सोशल डिस्टन्सिंग केवळ शिवजयंती करता असतं ते नाईट लाईफसाठी थोडी आहे? त्या करता आदेश मिळालेत की नाईट लाईफ चाललंच पाहिजे,” असं उपरोधात्मक उत्तर फडणवीस यांनी दिलं. तसेच, या सर्व प्रकारांमधून आता सरकारचा खरा चेहरा यामधून समोर येतोय, असंही फडणवीस म्हणाले.

मुंबईमधील नाईट लाईफला चालना देण्याची गरज असल्याचे पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी अनेकदा म्हटलं आहे. आदित्य ठाकरेंच्या वरळी मतदारसंघामधील काही क्लब आणि पबचे व्हिडीओ रविवारी व्हायरल झाल्यानंतर करोनाचे निर्बंध असतानाही या गोष्टींना परवानगी देण्यावरुन चांगलीच टीका झाल्याचे समाज माध्यमांवर पहायाला मिळालं. सरकारने शिवजयंतीनिमित्त करोनाच्या पार्श्वभूमीवर काही अटी आणि शर्थी घातल्या होत्या. याच साऱ्याचा संबंध जोडून फडणवीस यांनी आदित्य यांना सुनावलं आहे.